अनैतिक संबंधातून थरारक प्रकार उघड
विजापूर : अनैतिक प्रेमसंबंधातून एक धक्कादायक आणि भयानक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासह मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचला. मात्र, पतीच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला आणि त्यानंतर १० दिवसांनी प्रियकर मृतावस्थेत आढळला. हा थरारक प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी डाऊन येथे ही घटना घडली आहे. बीरप्पा पुजारी हे आपली पत्नी सुनंदा आणि दोन मुलांसह राहतात. ३१ ऑगस्टच्या रात्री जेवण करून ते कुटुंबासह झोपी गेले असताना, रात्री दोनच्या सुमारास दोन व्यक्ती घरात घुसले. त्यांनी अचानक बीरप्पाचा गळा आवळायला सुरुवात केली, तर सुनंदा त्यांना 'त्याला जिवंत सोडू नका, ठार करा', असे म्हणून प्रोत्साहन देत होती.
हा सर्व प्रकार पाहून बीरप्पाने ताकद लावून हल्लेखोरांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी आणि घरमालक धावून येताच दोघांनीही पळ काढला. या हल्ल्यात बीरप्पा जखमी झाला, पण त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत सुनंदाला अटक केली. पोलीस तपासात हल्ला करणारा व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचे उघड झाले.
दरम्यान, घटनेनंतर दहा दिवसांनी गावाजवळील एका जंगलात सुनंदाचा प्रियकर सिद्धप्पा मृतावस्थेत आढळला. सुनंदाला अटक झाल्यानंतर तिने या गुन्ह्याचा कट सिद्धप्पानेच रचल्याचा बनाव केला. तसेच, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सांगण्याचा तिने प्रयत्न केला. यामुळे व्यथित झालेल्या सिद्धप्पाला, पोलीस आपल्याला पकडतील आणि आपण यात कायमचे अडकू, अशी भीती वाटू लागली. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सिद्धप्पाने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने सुनंदासोबतचे प्रेमसंबंध आणि यातूनच घडलेला हा प्रकार कबूल केला होता. आता सिद्धप्पाने आत्महत्या केली की त्याची हत्या करून त्याला लटकवण्यात आले, याचा तपास पोलीस करत आहेत.