पणजी : हवामान खात्याने राज्यात आजपासून १५ सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार, या तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच राज्यात ढगाळ वातावरण होते आणि दुपारच्या वेळेस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पणजीत कमाल ३१ अंश, तर किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस राहिले.
दरम्यान, राज्यात १ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ११६.०५ इंच पावसाची नोंद झाली असून, यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहे. सांगेमध्ये १५३.७२ इंच, धारबांदोडामध्ये १५१.५८ इंच, वाळपईमध्ये १५० इंच, केपेमध्ये १४१.८० इंच, फोंडामध्ये १२३.७३ इंच, साखळीमध्ये ११९.२८ इंच, पेडण्यात ११३.५० इंच, काणकोणमध्ये १११.७५ इंच, जुने गोवे मध्ये ११०.०६ इंच तर म्हापसा मध्ये ९८ इंच पावसाची नोंद झाली आहे.