म्हापसा शाखेच्या आवारातून उचलली दुचाकी; चोराचे कृत्य सीसीटीव्हीत कैद
म्हापसा : तळीवाडा, म्हापसा येथील मुथूत फायनान्सच्या शाखेच्या आवारात पार्क केलेली एक मोटारसायकल अज्ञात चोराने दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही दुचाकी मुथूट फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याची असून, याप्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी, १२ रोजी दुपारी घडली. मुथूट फायनान्स कंपनीच्या गोवा विभागाचे कनिष्ठ गोल्ड ऑडिटर प्रतिनिधी नागाप्पा मनगुली हे आपल्या सहकाऱ्यासोबत सोन्याच्या दागिन्यांचे ऑडिट करण्यासाठी म्हापसा शाखेत आले होते. सकाळी ९ वाजता त्यांनी जीए ०८ एजी ९२४५ क्रमांकाची आपली मोटारसायकल शाखा इमारतीजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. सायंकाळी ६.३० वाजता ऑडिटचे काम संपल्यानंतर ते बाहेर आले असता, त्यांची दुचाकी जागेवर नव्हती.
चोरीचा हा प्रकार शाखेजवळील एका आस्थापनाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये एक अज्ञात चोरटा मोटारसायकल चोरून नेताना स्पष्टपणे दिसत आहे. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच मनगुली यांनी तातडीने म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला, मात्र ती अद्याप सापडलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही मुथूट फायनान्सच्या याच शाखेच्या परिसरातून पार्क केलेली दुचाकी दोन स्थानिक तरुणांनी चोरून नेली होती. तो प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.