काँग्रेसचा थेट आरोप; ड्रग्सच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सरकारला घेरले
पणजी: बिट्स पिलानी येथील एका विद्यार्थ्याचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झालेला मृत्यू हा साधा मृत्यू नसून तो खूनच असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात अमली पदार्थ जप्त करण्याचे प्रमाण सातपटीने वाढले असतानाही सरकार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत भिके बोलत होते. यावेळी त्यांनी दैनिक 'गोवन वार्ता'च्या वृत्ताचा संदर्भ देत सांगितले की, राज्यात दररोज ड्रग्स जप्त केले जात आहेत. त्यांनी आकडेवारी सादर करत म्हटले की, २०२२ मध्ये अमली पदार्थांच्या १००० प्रकरणांची नोंद झाली. २०२३ मध्ये २.२४ टन ड्रग्स जप्त करण्यात आले, तर २०२४ मध्ये १० कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले. यंदा २०२५ च्या मध्यापर्यंतच ७३ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
सरकारवर टीका
भिके यांनी सरकारला प्रश्न विचारला की, एकीकडे सरकार राज्याच्या प्रगतीची आणि नोकऱ्या देण्याची भाषा करते, तर दुसरीकडे ड्रग्स कुठून येतात हे त्यांना कळत नाही. ड्रग्स आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचले आहेत, तरीही मुख्यमंत्री गप्प का आहेत? मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
स्पष्टीकरण न दिल्या रस्त्यावर उतरू
यावेळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेश नादार यांनी, बिट्स पिलानी परिसर ज्या मतदारसंघांत येतो, त्या कुठ्ठाळीचे आमदार अँटोन वास या विषयावर एकही शब्द बोलत नाहीत, अशी टीका केली. सरकारने यावर स्पष्टीकरण न दिल्यास किंवा ठोस उपाययोजना न केल्यास पालक आणि विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.