गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाजीपाल्याच्या विक्रीत २० मेट्रिक टनची वृद्धी
पणजी : गणेश चतुर्थीच्या काळात गोव्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोवा फलोत्पादन महामंडळाला भाजीपाला पुरवणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने, गावठी भाजीपाला विक्रीत २० मेट्रिक टनची वाढ नोंदवली गेली. तसेच, यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तब्बल ५ लाख रुपयांची वाढ झाली, अशी माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
चतुर्थीच्या सुरुवातीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या दोन आठवड्यांच्या काळात महामंडळाने विक्री केलेल्या भाजीपाल्याची, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाजीपाल्याची आणि त्यांना मिळालेल्या लाभाची आकडेवारी देसाई यांनी जाहीर केली. गेल्या वर्षी चतुर्थीच्या काळात २७७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर यंदा ७५ नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यामुळे हा आकडा ३५२ वर पोहोचला आहे.
महामंडळाने गेल्या वर्षी चतुर्थीच्या काळात ६१.३५ मेट्रिक टन भाजीपाला १८ लाख रुपयांना खरेदी केला होता. यंदा त्यात वाढ होऊन ८१.४० मेट्रिक टन भाजी २३.०५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. यामुळे यंदा भाजीपाला विक्रीत २० टनांची वाढ झाली असून, शेतकऱ्यांच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.