कर्जाची परतफेड न केल्याने सारस्वत बँकेची कारवाई
वास्को : येथील माजी आमदार कार्लुस आल्मेदा हे सारस्वत को-ऑप. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने आल्मेदा यांचे दोन फ्लॅट शुक्रवारी (दि. १२) एका कारवाईत जप्त करण्यात आले. सदर फ्लॅट जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्यावर त्या फ्लॅटांचा ताबा बॅंकेकडे देण्यात आला.
आल्मेदा यांनी काही कारणास्तव सदर बँकेकडून काही वर्षापूर्वी कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्तेही भरले नव्हते. यानंतर कर्जाची रक्कम वाढत गेली. शेवटी बँकेने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाचा आधार घेतला. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ ने आल्मेदा यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सदर कारवाई केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक वैभव नाईक, बॅंकेचे काही अधिकारी उपस्थित होते.
आल्मेदा यांचा गोवा शिपयार्डनजीकच्या प्राईम कॉम्प्लेक्स इमारतीतील एक फ्लॅट तसेच चिखली येथील प्राईम हार्मनी इमारतीतील एक फ्लॅट अशा दोन फ्लॅटला सील ठोकण्यात आले. कर्जाची रक्कम दीड- दोन कोटी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कर्जाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकल्याने शेवटी बँकेने सदर पावले उचलली.