भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला

देशभरात संतापाची लाट : ठिकठिकाणी निदर्शने; सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
44 mins ago
भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला

दुबई : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना देशात मात्र या सामन्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये झालेल्या रक्तपाताच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी निदर्शने होत असून, सोशल मीडियावरही सामना रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे आशिया चषकातील भारत-पाक लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी, दुसरीकडे देशांतर्गत संताप आणि विरोधाची ही लाट सरकार व क्रिकेट मंडळासाठी डोकेदुखी ठरत आहे.
काँग्रेस नेते पवन खेड़ा यांनी या सामन्याला कडाडून विरोध दर्शवला. ते म्हणाले, जेव्हा रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तेव्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना कसा खेळला जाऊ शकतो?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सामन्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, रविवारी होणाऱ्या या सामन्याचा बहिष्कार करण्याची संधी आहे. यामुळे जगासमोर दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट होईल. पंतप्रधान स्वतः म्हणाले आहेत की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर रक्त आणि क्रिकेट कसे वाहू शकते?
हरियाणाचे क्रीडामंत्री गौरव गौतम यांनी सांगितले, भारताने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानला करारा धडा शिकवला आहे. हा सामना जिंकणेही निश्चित आहे.
मात्र याचवेळी यूपीतील कानपूरमध्ये ओवैसींच्या पक्षाने सामन्याचा निषेध नोंदवला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या, रस्त्यावर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ लिहिलेल्या पोस्टरला पायाने तुडवले.
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
एका युजरने लिहिले, जर हा सामना झाला तर भाजपसाठी उलट गिनती सुरू होईल. दुसऱ्याने लिहिले, रक्तापेक्षा व्यवसाय महत्त्वाचा ठरतो आहे. आणखी एका युजरने टीका करत लिहिले शहीदांच्या चितेवर भाकऱ्या भाजणे ही आपल्या राजकारण्यांची जुनी पद्धत आहे, पण आता आपण खूप खालच्या पातळीवर पोहोचलो आहोत.
सरकार आपले काम करेल : कपिल देव
कपिल देव यांनी क्रिकेट चाहत्यांना विनंती केली आहे की, हा सामना होऊ द्या. कारण दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध खेळायचे की नाही हा बीसीसीआय किंवा पीसीबीचा निर्णय नाही. तर हा निर्णय दोन्ही देशातील सरकारकडून घेण्यात आला आहे. आपला संघ चांगला आहे. पहिला सामना भारताने सहज जिंकला. मला विश्वास आहे ते ट्रॉफी जिंकून येतील. भारतीय संघाला मला एकच सांगायचे आहे, जिंकत रहा. खेळणे हे त्यांचे काम आहे आणि त्यांनी त्यावर लक्ष द्यावे. सरकार आपले काम करेल, खेळाडूंनी आपण काम करावे.
बीसीसीआय असंवेदनशील : ऐशन्या द्विवेदी
पहलगाम हल्ल्यात आपला पती गमावलेल्या ऐशन्या द्विवेदी यांनी सामना पाहू नये, असे भावनिक आवाहन जनतेला केले आहे. त्या म्हणाल्या, हा सामना पाहण्यासाठी कोणीही स्टेडियमवर जाऊ नये किंवा टीव्हीवरही तो पाहू नये. बीसीसीआयने हा सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. पहलगाम हल्ल्यातील २६ कुटुंबांचे आणि ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांचे दु:ख त्यांना जाणवत नाही का? बीसीसीआयला या कुटुंबांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नाही.
भारत वि. पा​किस्तान आयसीसी स्पर्धेतील आकडीवारी
एकदिवसीय विश्वचषक : ८ सामने : भारत विजयी ८-०
टी-२० विश्वचषक : ८ सामने : भारत विजयी ७-१
एकूण १६ सामन्यांपैकी भारत १५ वेळा विजयी, पाकिस्तान फक्त एकदाच.

आशिया चषकातील आकडेवारी (१९८४ पासून)
खेळलेले सामने : १८
भारत विजयी : १०
पाकिस्तान विजयी : ६
निकाल लागला नाही : २
विशेष म्हणजे, भारत-पाकिस्तान संघ कधीही आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आमने-सामने आलेले नाहीत. त्यांची गाठ गट किंवा सुपर-४ सामन्यातच पडते.

आशिया चषक विजेतेपद
भारत : ८ (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३)
श्रीलंका : ६ : पाकिस्तान : २

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, सैफ फरीद, सॅम अयुब, सलमान मिर्झा, सफयान मोकीम.      

हेही वाचा