अफगाणिस्तानचा हाँगकाँगवर ९४ धावांनी एकतर्फी विजय

टी-२० आशिया कप : अफगाणिस्तानची विजयी सुरुवात

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
7 hours ago
अफगाणिस्तानचा हाँगकाँगवर ९४ धावांनी एकतर्फी विजय

अबू धाबी : आशिया कप २०२५ स्पर्धेची सुरुवात अफगाणिस्तानने विजयाने केली. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाने ६ गडी गमावून १८८ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ ९ विकेट्स गमावून फक्त ९४ धावा करू शकला. त्यामुळे, अफगाणिस्तानने ९४ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि दोन गुण मिळवले.
हाँगकाँगची निराशाजनक कामगिरी
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात अंशुमन रथ 'गोल्डन डक' झाला. फझलहक फारुकीने त्याचा बळी घेतला. त्यानंतर झिशान अली ५ धावांवर बाद झाला. कर्णधार निजाकत खान एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. यामुळे, पॉवरप्ले संपल्यानंतर हाँगकाँगची अवस्था ४ गडी गमावून २२ धावा अशी होती आणि तेव्हाच त्यांच्या पराभवाची शक्यता निश्चित झाली होती.
बाबर हयातने एक बाजू सांभाळून ठेवली, पण तो खुलून खेळू शकला नाही. त्याने ४३ चेंडूंत ३ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. बाबर वगळता, केवळ कर्णधार यासिम मुर्तझा यानेच दुहेरी आकडा गाठला. हाँगकाँगच्या फलंदाजांनी संपूर्ण २० षटकांत केवळ दोन चौकार मारले. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नैबने ३ षटकांत ८ धावा देत २, तर फझलहक फारुकीनेही २ गडी बाद केले.

सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १८८ धावा केल्या. यामध्ये सेदीकुल्लाह अटल (नाबाद ७३), अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी (३३) आणि अझमतुल्लाह ओमरझई यांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. ओमरझईने चौफेर फटकेबाजी करत टी-२० आशिया कपच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले.
अफगानिस्तानला सुरुवातीला धक्के बसले, जेव्हा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला इब्राहिम झाद्ररनही केवळ एक धाव काढून पॅव्हिलियनमध्ये परतला. मात्र, या संकटकाळात सेदिकुल्लाह अटलने एक बाजू सांभाळली आणि शानदार अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक आहे. परंतु, यावेळी त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. दुसरीकडे, अजमतुल्ला उमरजईनेही आक्रमक खेळी करत केवळ २१ चेंडूंवर ५३ धावांची खणखणीत खेळी केली.
उमरझईची ऐतिहासिक खेळी
झमतुल्लाह उमरझईने अवघ्या २१ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २५२.३८ होता. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. त्याने केवळ २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यासह, टी-२० आशिया कपमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला, ज्याने २०२२ मध्ये २२ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
सेदीकुल्लाह आणि नबीचे योगदान
ओपनर सेदीकुल्लाह अटलने शेवटपर्यंत नाबाद राहत अफगाणिस्तानला १८० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने ५२ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १४०.३८ होता. तर, मोहम्मद नबीने २६ चेंडूंत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३३ धावा जोडल्या. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
अटलने साकारली कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी
सेदिकुल्लाह अटलने यापूर्वी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ६४ धावांची खेळी केली होती. मात्र, हाँगकाँगविरुद्धच्या या सामन्यात त्याने त्याहीपेक्षा जास्त (७३) धावा केल्या. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आणि केवळ १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अटलच्या नावावर आता २५० हून अधिक धावा जमा झाल्या आहेत.
अटलचे ४ सामन्यांत तिसरे अर्धशतक
सेदिकुल्लाह अटलने नुकत्याच झालेल्या अफगानिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील तिरंगी मालिकेतही अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याने त्या मालिकेत पाकिस्तान आणि युएईविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. गेल्या चार सामन्यांत त्याने तीन अर्धशतके ठोकली आहेत. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आगामी सामन्यांत तो आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अतीक इकबालने रचला इतिहास
अतीक इकबालने डावातील चौथ्या षटकात अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहिम झद्रानला बाद केल्यानंतर मोहम्मद नबी फलंदाजीसाठी उतरला. अतीकच्या पुढील चार चेंडूंवर नबीला एकही धाव काढता आली नाही. अशा प्रकारे अतीकने मेडन षटक टाकताना विकेटही घेतली. यासह, टी-२० आशिया कपच्या पॉवरप्लेमध्ये विकेट घेऊन निर्धाव षटक टाकणारा अतीक इकबाल हा चौथा गोलंदाज ठरला.
टी-२० आशिया कप पॉवरप्लेमध्ये विकेटसह निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज :
- मोहम्मद आमिर (पाकिस्तान) वि. यूएई, मीरपूर, २०१६
- भुवनेश्वर कुमार (भारत) वि. यूएई, मीरपूर, २०१६
- शाहनवाज दहानी (पाकिस्तान) वि. हाँगकाँग, शारजा, २०२२
- अतीक इकबाल (हाँगकाँग) वि. अफगाणिस्तान, अबू धाबी, २०२५
........
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १८८ धावा
हाँगकाँग : २० षटकांत ९ बाद ९४ धावा