बांधकाम उद्योजकासह पंच, व्यावसायिकावर कारवाई
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी मंगळवारी पहाटेपासून बार्देश तालुक्यात छापासत्र आरंभ केले. एका बांधकाम उद्योजकासह स्थानिक पंच आणि एका व्यावसायिकाच्या हणजूण आणि आसगाव येथील एकूण चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ईडीने स्थानिक पंच आणि एका व्यावसायिकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणाशी संबंधित आणि एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या उद्योजकाच्या हणजूण येथील घरावर, तसेच कार्यालयावर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान स्थानिक पंचासह एका व्यावसायिकाच्या घरावरही छापा टाकला. ईडीने किनारी भागातील हणजूणमधील तीन आणि आसगावमधील एका ठिकाणी मिळून एकूण चार ठिकाणी छापे टाकले. ईडीने दस्तावेज तसेच इलेक्ट्रॅानिक यंत्रणा जप्त केल्याची माहिती आहे.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यात हणजूण कोमुनिदादची सुमारे लाखो चौ. मी. जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याची तक्रार कोमुनिदादच्या अॅटर्नीने दिली होती. संबंधित जमीन १९५२ मध्ये बनावट विक्री पत्राद्वारे हडप केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
पंच, व्यावसायिकाची रात्री उशिरापर्यंत चौकशी
जमीन हडप प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यात मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने तपास केला. तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी आणि उपसंचालक डाॅ. भागीरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी पहाटे ६ वा. वरील ठिकाणी छापासत्र सुरू केले. ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर पथकाने स्थानिक पंच आणि एका व्यावसायिकाला ताब्यात घेतले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.