न कळवता राज्याबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कार्मिक’ची तंबी

खातेप्रमुखांना रजा, अधिकृत दौऱ्यासाठी परवानगी आवश्यक


12 hours ago
न कळवता राज्याबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कार्मिक’ची तंबी

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : राज्य सरकारची परवानगी न घेता किंवा कार्मिक खात्याला न कळवता रजा घेणाऱ्या तसेच पूर्व परवानगी न घेता गोव्याबाहेर दौरे करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना, खाते प्रमुखांना रजेवर अथवा अधिकृत कामासाठी दौऱ्यावर जाण्यापूर्वी कार्मिक खात्याची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. परवानगी न घेता रजेवर गेल्यास त्या अधिकाऱ्यावर सीसीएस (रजा)  नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाणार आहे. कार्मिक खात्याच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी नुकतेच याबाबत परिपत्रक जारी केले आहे.             

परिपत्रकात म्हटले आहे की, कार्मिक खात्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेले काही खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर अथवा अधिकृत दौऱ्यावर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याबाबत कार्मिक खात्याला माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्या खात्याच्या सुरळीत कामकाजावर परिणाम होतो. शिवाय असे केल्याने सीसीएस (रजा) नियम, १९७२ आणि त्यामधील संबंधित सूचनांचे उल्लंघन होत आहे.        वरील बाब लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी, खातेप्रमुख,जीसीएस, जीपीएसच्या अधिकाऱ्यांनी रजेवर किंवा अधिकृत दौऱ्यावर जात असताना याबाबत आगाऊ सूचना देणे, अनेक दिवस आधी कार्मिक खात्याला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे कार्मिक खात्यातील सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होईल. खातेप्रमुखांसह सर्व अधिकाऱ्यांनी कार्मिक खात्याच्या पूर्वपरवानगी शिवाय रजेवर अथवा अधिकृत दौऱ्यावर जाऊ नये, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.