सोनसडोवर आता गॅसिफिकेशन प्रकल्प

मडगाव पालिकेचा निर्णय : पुण्यातील प्रकल्पाची करणार पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
सोनसडोवर आता गॅसिफिकेशन प्रकल्प

मडगाव : मडगावातील सोनसडो येथे सध्या कचरा हाताळणी सुरू असली तरी त्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया होत नाही. याआधी उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडल्यामुळे आता नव्याने गॅसिफिकेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पुणे येथील जी. डी. इर्न्व्हामेंटल कंपनीकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पुण्यातील प्रकल्प पाहणीअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
पुण्यात या कंपनीकडून १५ टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवला जातो. त्याच धर्तीवर १० टन प्रतिदिन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्रकल्प सोनसडो येथे उभारण्याचा विचार आहे. यापूर्वी माजी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाची पाहणी केली होती. या कंपनीने प्रकल्पाची क्षमता वाढवून २५ टनांवर नेली असून लडाखसह देशातील पाच ठिकाणी अशा प्रकल्पांची यशस्वी हाताळणी होत आहे.
या कंपनीकडून सोनसडो येथे १० टीपीडी गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिका मंडळाने आधीच घेतलेला आहे. त्यानुसार कंपनीचे अजित गाडगीळ आणि अभिजीत दातार यांनी पालिका सभागृहात नगरसेवकांना प्रात्यक्षिक दिले.
सध्या मडगाव पालिकेकडून सॅनिटरी पॅड्स, डायपर यांसारख्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रति किलो १८ रुपये दराने खर्च केला जात असून आतापर्यंत १ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. त्यामुळे सोनसडोतील प्रकल्पासाठी साडेसात कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वच्छतेसाठी नव्या दृष्टीने प्रयत्न
मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांनी इंदूर शहराचा आदर्श समोर ठेवत, इंदूरने सलग तीन वर्षे स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे. सोनसडो येथेही प्रकल्प उभारून योग्य प्रकारे चालवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. याआधीचे प्रकल्प अपयशी ठरल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, नव्या प्रकल्पात मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने वर्गीकरणाचा त्रास कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

सोनसडो येथे प्रकल्प आल्यास कचर्‍याची हाताळणी व विल्हेवाटीसाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे या प्रकल्पाची तातडीने गरज आहे.
दामू शिरोडकर, नगराध्यक्ष