गोवा : स्वस्त धान्य दुकानांतून महिन्याभरात सुमारे ४ हजार टन धान्याची विक्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा : स्वस्त धान्य दुकानांतून महिन्याभरात सुमारे ४ हजार टन धान्याची विक्री

पणजी : गोव्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या महिन्यात सुमारे ४ हजार टन धान्याची विक्री झाली आहे. यात तांदळाला गव्हापेक्षा जास्त मागणी असल्याचे दिसून आले. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ८१.५४ टक्के शिधापत्रिकाधारकांनी तांदूळ घेतला, तर ३१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी गव्हाचा लाभ घेतला.

ऑगस्ट महिन्यात राज्यामध्ये २.६३ लाख शिधापत्रिकाधारक होते. त्यापैकी २.१४ लाख शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून तांदूळ विकत घेतला, तर ८३,१९२ शिधापत्रिकाधारकांनी गहू घेतला. आकडेवारीनुसार, उत्तर गोव्यात १.२० लाख कार्डांपैकी ९९,०५० कार्ड वापर झाला. यात १७०३ टन तांदूळ विकला गेला. तर, दक्षिण गोव्यात १.४२ लाख कार्डांपैकी १.१५ लाख कार्डांचा वापर करून १८८९ टन तांदळाची विक्री झाली. एकूण, गोव्यात ऑगस्ट महिन्यात ३,५९३ टन तांदळाचा खप झाला.

गव्हाच्या मागणीचा विचार केल्यास, उत्तर गोव्यातील ३७,७७५ कार्डधारकांनी २९७ टन गहू घेतला, तर दक्षिण गोव्यातील ४५,४१७ कार्डधारकांनी ३५७ टन गहू खरेदी केला. ऑगस्ट महिन्यात एकूण ६५४ टन गव्हाची विक्री झाली. 

हेही वाचा