पणजी : गोव्यामध्ये कर्ज घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मालमत्ता तारण ठेवणे आता स्वस्त झाले आहे. राज्य सरकारने नुकत्याच अधिसूचित केलेल्या 'भारतीय स्टॅम्प दुरूस्ती कायदा २०२५' नुसार, आता मालमत्ता तारण ठेवण्यासाठी केवळ एक हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. याआधी यासाठी नियमित दराने शुल्क आकारले जात होते.
या नवीन कायद्यानुसार, केवळ मालमत्ता तारण ठेवण्यापुरतेच बदल झाले नसून, इतर व्यवहारांसाठीही काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आई, वडील, मुलगा, नातू, पुतण्या, जावई किंवा सून अशा जवळच्या नातेवाईकांना जमीन किंवा मालमत्ता भेट दिल्यास किंवा दान केल्यास ५,००० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. तसेच, मालमत्ता तारण ठेवणारी व्यक्ती भाडे किंवा लीज शुल्क गोळा करण्यासाठी 'पॉवर ऑफ ॲटर्नी' देत असेल, तर त्यासाठी ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी निश्चित करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, धार्मिक किंवा सेवाभावी ट्रस्टला जमीन किंवा मालमत्ता दिल्यास प्रत्येक ५०० रुपयांसाठी १० रुपये या प्रमाणे स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत झाल्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेने हे बदल लागू झाले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मालमत्तांशी संबंधित आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि कमी खर्चाचे होणार आहेत.