मडगाव : ईद ए मिलादच्या निमित्ताने राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून जुलूस काढण्यात आला. या जुलूसच्या व्हिडिओवर काहीजणांनी धार्मिक भावना दुखावण्यासारखे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे. याप्रकरणी सोमवारी तन्झीम इ आला हजरत इमाम अहमत रझा या संस्थेतर्फे मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केलेली आहे.
मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा पोलिस मुख्यालयाकडे सोमवारी पुन्हा एकदा मडगाव व परिसरातील मुस्लिम बांधवांनी जमाव केला. राज्यात मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद साजरा करतानाच मिरवणुका काढल्या. या जुलूसाच्या एका व्हिडिओवर जुझे इनासिओ रॉड्रिग्ज याच्यासह राज मॅक, आयुर्वेद गोवा, जगदीश नाईक, ऋषिकेश एम. नामक समाज माध्यमांवरील अकाउंटद्वारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केली आहे. या व्यक्तींवर गुन्हा नोंद करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार तन्झीम इ आला हजरत इमाम अहमत रझा या संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे. मुस्लिम बांधवांनी या प्रकाराबाबत दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांचीही भेट घेत कारवाईची मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मुस्लिम बांधव हे आपल्या कुटुंबापेक्षाही जास्त देवाला मानतात. त्या देवाबाबत चुकीचे शब्द ऐकून घेणार नाही. पैगंबराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने जुझे इनासिओ रॉड्रिग्ज याच्यासह राज मॅक, आयुर्वेद गोवा, जगदीश नाईक, ऋषिकेश एम. नामक समाजमाध्यमांवर कारवाईची मागणी केलेली आहे. वास्को पोलिसांनी राज मॅक याला याप्रकरणात अटक केलेली आहे, तसेच इतर संशयितांनाही शोधून कारवाई करावी. जुझे इनासिओ रॉड्रिग्ज हा व्यक्ती लंडनला वास्तव्यास असून त्याला तेथून अटक करत धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई होते हे पोलिसांनी दाखवून द्यावे. मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घालावे, अशी मागणी केली.
आतापर्यंत एकास अटक, इतरांवरही कारवाई होणार : पोलिस अधीक्षक
पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले की, ईद निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या व्हिडिओंवर काहीजणांनी आक्षेपार्ह टिपणी केली. याप्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्थानकांत तक्रारी आलेल्या आहेत. वास्को पोलिसांनी याप्रकरणी राज मॅक उर्फ भाशुराज मकपूर याला अटक केलेली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कायद्यानुसार जी कारवाई असेल ती केली जाईल, असे स्पष्ट केले.