मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मडगाव : मित्राच्या वाढदिवसाचा जल्लोष संपवून घराकडे परतणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. मोबोर, केळशी येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आनंदाचा क्षण दुःखात विरून गेला. लक्ष वाधवा (वय २२, मूळ रा. जयपूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
लक्ष्य वाधवा हा मूळचा जयपूरचा असून, गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होता. रविवारी रात्री तो आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बाणावली येथे गेला होता. तेथे मित्रांसोबत आनंद साजरा करून तो पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परत येत होता. दरम्यान मोबोर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीचा त्याला अंधारात अंदाज आला नाही आणि त्याची दुचाकी थेट त्या लॉरीवर आदळली.
गंभीर जखमी अवस्थेत लक्ष्यला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. कोलवा पोलिसांनी घटनास्थळावर जात पंचनामा करत अपघाप्रकरण नोंद करुन घेतलेले आहे. याप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल खाजणेकर पुढील तपास करत आहेत.