काेमुनिदादच्या जागेत प्रस्ताव : प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
फोंडा : आयआयटीला (IIT) कायमस्वरूपी जागा देणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एका बाजूने करत असतानाच गोव्यात सगळीकडेच आयआयटीच्या प्रस्तावित जागांना विरोध होऊ लागला आहे. नव्याने निवडण्यात आलेल्या बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार येथील जागेलासुद्धा विरोध होत आहे.
बेतोडा पंचायत क्षेत्रातील कोडार येथील काहीशी खडकाळ व काहीशी बागायती असलेली साडेचौदा लाख चौरस मीटर जमीन सरकारने ताब्यात घेण्याच्या हालचाली केल्या आहेत. ही जागा कोमुनिदादच्या मालकीची आहे. सदर जागेत आयआयटीचा प्रकल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र याची कुणकुण लागताच ग्रामस्थ नाराज झाले. त्यांनी सोमवारी जाहीर सभा घेऊन विरोध दर्शविला. वेताळ मंदिरात झालेल्या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मतानुसार प्रस्तावित जागेपैकी खूप कमी जमीन खडकाळ आहे, तर उर्वरित जमीन लागवडीखाली येणारी आहे. तिथे लोकांच्या मालकीची नारळ, सुपारी आदी झाडे आहेत. त्याचबरोबर काही भागात औषधी गुणधर्म असलेली झाडेसुद्धा आहेत. या परिसरात वन्यप्राणीही आहेत. आयआयटीचा प्रकल्प सुरू झाल्यास येथील झाडे तोडली जातील. परिणामी पर्यावरणाची हानी होईल. त्याचबरोबर वन्यप्राण्यांनाही समस्या उद्भवणार आहे.
लोकांना विश्वासात का घेतले नाही?
- ही जागा निश्चित करण्याअगोदर सरकारने लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते. परंतु असे झालेले नाही. म्हणूनच लोक नाराज आहेत. पर्यावरणाची हानी करून तिथे प्रकल्प होऊ देणार नाही, असा पवित्रा लोकांनी घेतला आहे.
- या संबंधी जनजागृती करण्यात येणार असून सर्व लोकांच्या सह्या असलेले निवेदन तयार करण्यात येणार आहे. ही निवेदने सरकारच्या विविध घटकांना देण्यात येणार आहेत.
- निवेदनानंतरसुद्धा सरकारने हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी प्रयत्न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा लोकांनी सोमवारच्या सभेत दिला आहे.