तिसवाडी : ‘द्वारके’च्या मदतीला पोचली ‘गंगोत्री’

इंजिन बिघडल्यामुळे ‘द्वारका’ रो-रो फेरीबोट नदीच्या मध्यभागी पडली बंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th September, 11:57 pm
तिसवाडी : ‘द्वारके’च्या मदतीला पोचली ‘गंगोत्री’

पणजी : चोडण-रायबंदर जलमार्गावरील ‘द्वारका’ रो-रो फेरीबोट, इंजिन बिघडल्यामुळे बंद पडली. या फेरीमधील प्रवासी सुमारे एक तास अडकून पडले होते. त्यानंतर ‘गंगोत्री’ नावाच्या दुसऱ्या रो-रो फेरीबोटीच्या मार्फत मदतकार्य करण्यात आले.

सोमवारी दुपारी सुमारे ४.३० वाजता ‘द्वारका’ रो-रो फेरीबोट बंद पडण्याची घटना घडली. ‘द्वारका’ ही रो-रो फेरीबोट नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर वाहतूक करत असताना तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ती नदीच्या मध्यभागी बंद पडली.

नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फेरीबोटीच्या इंजिनचा कुलिंग फॅन बंद पडल्यामुळे इंजिन नादुरुस्त झाले. हा कुलिंग फॅन इंजिन थंड करण्याचे काम करतो. फेरी सुरू असताना हे इंजिनचे पंखे तुटून बंद पडले. परंतु फेरीबोट कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही आणि त्यांनी फेरीबोट तशीच सुरू ठेवली. नंतर पंखा बंद पडल्यामुळे फेरीचे इंजिन गरम झाले आणि ते पूर्णपणे बंद पडले. इंजिन गरम झाल्यामुळे त्यात मोठा बिघाड झाला आणि ते पुन्हा सुरू करणे शक्य झाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

फेरीबोट नदीच्या मध्यभागी बंद पडल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. त्याचवेळी, या मार्गावर तैनात असलेली दुसरी ‘गंगोत्री’ फेरी बंद पडलेल्या ‘द्वारका’ फेरीबोटीच्या मदतीसाठी आली. ‘गंगोत्री’ने द्वारका फेरीमधील प्रवासी आणि वाहनांना घेऊन त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. या सर्व गोंधळात फेरीबोटीतील प्रवासी सुमारे एक तास अडकून पडले होते.

चोडण-रायबंदर मार्गावर जुनी फेरीबोट तैनात

सध्या ‘द्वारका’ रो-रो फेरी चोडण किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आली आहे. विजय मरीन सर्व्हिसेसच्या यार्डमध्ये ती फेरी दुरुस्तीसाठी नेली जाईल. त्यानंतरच इंजिनच्या पंख्यात बिघाड कसा झाला, याची चौकशी केली जाईल. दरम्यान, नदी परिवहन खात्याने एक जुनी फेरीबोट चोडण-रायबंदर मार्गावर तैनात केली आहे.

हेही वाचा