वास्को : रस्ते आणि पुलांच्या कामाआधी सर्व्हिस रोड आवश्यक: दिगंबर कामत;पीडब्ल्यूडी मंत्री.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th September, 03:22 pm
वास्को : रस्ते आणि पुलांच्या कामाआधी सर्व्हिस रोड आवश्यक: दिगंबर कामत;पीडब्ल्यूडी मंत्री.

पणजी : सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी राज्यात भविष्यात कोणत्याही उड्डाणपुलाचे किंवा पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी प्रवाशांसाठी योग्य सर्व्हिस रोड तयार करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. तसेच, गोव्यातील रस्त्यांची गुणवत्ता सर्वोत्तम ठेवण्यावर आपला भर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

वालेस जंक्शनजवळील खड्डेमय रस्त्याची पाहणी करण्यासाठी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो आणि इतर अधिकाऱ्यांसोबत केलेल्या संयुक्त पाहणीदरम्यान कामत यांनी हे निर्देश दिले. या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच, उड्डाणपुलाच्या कामामुळे नुकत्याच झालेल्या अपघातांत दोन तरुणांचा जीव गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती.

३० सप्टेंबरपर्यंत हॉट मिक्सिंगचे काम पूर्ण करण्याचे आदेश

लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विनंतीवरून मी येथे आलो आहे. पाहणीनंतर आम्ही दोन्ही बाजूचे रस्ते ३० सप्टेंबरपर्यंत हॉटमिक्स करण्याचे निश्चित केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले आहे की, जर जोरदार पाऊस आला नाही, तर २० सप्टेंबरपर्यंत हॉटमिक्स प्लांट सुरू करून दोन दिवसांत काम पूर्ण केले जाईल असे पाहणीनंतर पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले.

सर्व्हिस रोडशिवाय काम नाही

यापुढे प्रवाशांच्या सोयीशिवाय कोणत्याही प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही. मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत की, राज्यात कुठेही उड्डाणपुलाचे किंवा पुलाचे काम सुरू करण्याआधी योग्य सर्व्हिस रोड तयार केला गेला पाहिजे. मला वाहनचालकांकडून कोणतीही तक्रार नको आहे. लोक सरकारला दोष देतात आणि ते चुकीचे नाहीत, कारण त्यांना खूप त्रास होत आहे, असे कामत म्हणाले.

या नवीन सर्व्हिस रोडसाठी स्थानिक पंचायत सदस्य आणि नागरिकांशी चर्चा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे रस्ते दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी असतील, अवजड वाहनांसाठी नाही. तसेच, पुढील दहा दिवसांत आवश्यक असलेले सर्व दिशादर्शक फलक (साइनबोर्ड) लावण्यासही सांगितले आहे. वाहतूक उपअधीक्षकांनी पाहणी करून अहवाल दिल्यानंतरच पुढील कामे सुरू केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या त्वरित कार्यवाहीचे स्वागत केले. “बॅरिकेड्सवर निऑन आणि रिफ्लेक्टिव्ह लाईट्स योग्य प्रकारे दिसले पाहिजेत आणि परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. कामत यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे ३० सप्टेंबरपर्यंत परिणाम दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी नुकत्याच झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करून योग्य बॅरिकेड्स लावण्याचीही विनंती केली.

काम पूर्ण झाले की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा भेट देणार असल्याचे सांगून कामत यांनी या विषयावर आपला ठामपणा दाखवला. चांगल्या रस्त्यांची निर्मिती, सार्वजनिक सुरक्षा आणि प्रवाशांची सोय ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल असे त्यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा