कुडाळ स्थानकावर रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात
म्हापसा : वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्याच्या रागास्तव रेल्वेमार्गे नागपूरला निघालेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाला कुडाळ स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्याला पर्वरी पोलिसांच्या सहाय्याने पालकांच्या स्वाधीन केले.
ही घटना शनिवार दि. ६ रोजी घडली. सतत मोबाईल फोन वापरत असल्याबद्दल वडिलांनी मुलाचा मोबाईल फोन काढून घेतला. हा मुलगा इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेतो. वडिलांनी आपला मोबाईल काढून घेतल्याचा त्याला राग आला. त्यामुळे त्याने पर्वरीहून थेट थिवी रेल्वे स्थानक गाठले. मडगाव-नागपूर मार्गावरील रेल्वे गाडी त्याने पकडली आणि तो नागपूरला निघाला. पालकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पर्वरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी लागलीच रेल्वे पोलिसांना माहिती दिली. कोकण रेल्वे पोलीस फोर्सच्या कणकवली विभागाने तत्काळ कार्यवाही करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून सदर मुलाला कुडाळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.
शहानिशा केल्यानंतर पर्वरी पोलिसांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर सदर मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलीस फोर्सचे निरीक्षक राजेश सुरवादे, सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील व कॉन्स्टेबल विक्रमजीत यांनी पर्वरी व पेडणे पोलिसांच्या सहाय्याने ही कामगिरी केली.