आगीवर नियंत्रण : मालमत्तेचे लाखोंचे नुकसान
मडगाव : तळावली येथे घराला आग लागण्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यात दोन सिलिंडरचा स्फोट झाला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले तसेच घरातील दोन सिलिंडर बाहेर काढण्यात आले.
तळावली येथील प्रभाग क्र. १ मध्ये घराला सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. हे घर प्रकाश परवार यांच्या मालकीचे असून या घरातील दोन भरलेल्या सिलिंडरला आग लागून स्फोट झाला. मातीचे कौलारु घर असून प्रकाश यांचा भाऊ या घराच्या बाजूलाच दुसर्या घरात राहतो. घराच्या मागील बाजूला पाणी तापवण्यासाठी चुलीत आग घातली होती. घरातील व्यक्ती बाहेर असतानाच आग इतरत्र पसरली व ती घराच्या लाकडी वाशांना लागून त्यांनी पेट घेतला. आग लागण्याची घटना घडली त्यावेळी प्रकाश यांच्यासह त्यांची पत्नी व मुलेही घरात नव्हती. आगीने पेट घेतल्याने किचनमध्ये असलेल्या दोन भरलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला.
दरम्यान, मडगाव अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर पाण्याचा मारा करत आग विझवली. तसेच घरातील आणखी एक भरलेला व एक रिकामी गॅस सिलिंडर बाहेर काढला.
मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी सांगितले की, तळावली येथे आगीच्या घटनेबाबत पणजी मुख्यालयाला कॉल गेला होता. त्याठिकाणी सुरावली येथे आग लागल्याचे सांगून त्याठिकाणी गाडी पाठवली होती. मात्र, काहीवेळाने तळावली पहिल्या प्रभागातील एका व्यक्तीने याठिकाणी आग लागल्याचे सांगताच दुसरी गाडी घेऊन घटनास्थळी आलो. तोपर्यंत आगीने पेट घेतला होता. पाण्याचा मारा करत आता आग विझवण्यात आली.
पाणी तापवण्यासाठी घरामागे असलेल्या चुलीतून आग पसरुन आग पूर्ण घराला लागली. दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, परंतु घरात त्यावेळी कुणीही नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. पूर्ण घर जळून गेले असून लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.