कामगारांच्या अपघाती मृत्यूची जबाबदारी बांधकाम खाते, कंत्राटदाराची

वेर्णातील अपघातप्रकरण : कामगार आयुक्तांकडून संयुक्तरीत्या भरपाई देण्याचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
कामगारांच्या अपघाती मृत्यूची जबाबदारी बांधकाम खाते, कंत्राटदाराची

मडगाव : वेर्णा येथे गेल्यावर्षी अपघात होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग व वेर्णा येथे रस्ता कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची आहे. त्यामुळे दोघांनीही मिळून पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, असा निर्णय कामगार आयुक्त लेविन्सन मार्टिन्स यांनी दिला आहे.

कामगार आयुक्त लेविन्सस मार्टिन्स यांनी कर्मचारी भरपाई कायद्यांतर्गत यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. २५ मे २०२४ रोजी वेर्णा औद्योगिक वसाहतीत रस्त्याचे काम करणार्‍या कंत्राटदाराने दिलेल्या तात्पुरत्या निवासस्थानात कामगार राहात होते. या तात्पुरत्या निवासस्थानाला एका बसने धडक दिली होती. या अपघातात बिहार येथील रमेश माहातो यांच्यासह एकूण चार कामगारांचा मृत्यू झाला होता.

कामगार आयुक्त लेविन्सन मार्टिन्स यांनी या प्रकरणी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, अपघातात मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना १३,६०,२७५ रुपये अदा करण्यात यावेत. २७ जून २०२४ पासून रक्कम मंजूर होईपर्यंत वार्षिक १२ टक्के व्याज देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम ३० दिवसांच्या आत कर्मचारी भरपाई आयुक्तांच्या कार्यालयात पणजीत देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

कंत्राटदार व बांधकाम विभागाकडून ही दुर्घटना बसचालकाने मद्यपान केल्याने व त्याच्या चुकीमुळे झाल्याचा युक्तिवाद सुनावणीवेळी केला होता. मात्र, हा वाद बाजूला ठेवून कामगार आयुक्त निर्णय देताना म्हणाले, कामगारांची तात्पुरती निवासस्थाने त्याठिकाणी नसती तर हा प्रकार घडला नसता. साहित्य ठेवण्यासाठी उभारलेली तात्पुरती साठवणुकीची जागा वास्तव्यासाठी वापरण्यात आली. कंत्राटदाराच्या देखरेखीखाली हे काम होत असल्याने याठिकाणी कामगार राहत होते, हे ज्ञात होते. अपघाताचे ठिकाण हे कामाचे ठिकाण नसून सार्वजनिक रस्त्याच्यानजीकचे ठिकाण होते, असे निरीक्षण नोंदवून कामगारांना दोन्ही पक्षांनी मिळून संयुक्तरीत्या भरपाईची रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत.

कामगार आयुक्तांनी नोंदवलेली निरीक्षणे

कामगारांची तात्पुरती निवासस्थाने त्याठिकाणी नसती तर हा प्रकार घडला नसता.

रस्ता करण्यासाठी आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी उभारलेली तात्पुरती साठवणुकीची जागा कामगारांच्या वास्तव्यासाठी वापरण्यात आली.

कंत्राटदाराच्या देखरेखीखाली हे काम होत असल्याने याठिकाणी कामगार राहत होते, हे ज्ञात होते.

अपघाताचे ठिकाण हे कामाचे ठिकाण नसून सार्वजनिक रस्त्याच्यानजीकचे ठिकाण होते.

अपघाताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वेर्णा येथे रस्ता कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची आहे. त्यामुळे दोघांनीही मिळून भरपाई द्यावी. 

हेही वाचा