नवी दिल्ली : शिक्षकांची नोकरी वाचवण्यासाठी आता शिक्षक संघटनांनीच कंबर कसली आहे. ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याची अट जुन्या शिक्षकांसाठी अनिवार्य केल्याने देशभरातील शिक्षक वर्गांत खळबळ उडाली आहे. नोकरी आणि पदोन्नती वाचवण्यासाठी शिक्षक संघटनांनी सरकारवर दबाव टाकण्याची रणनीती आखली असून, कायदेशीर मार्गही अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
१ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांच्या आत 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. जर शिक्षक ही परीक्षा पास होऊ शकले नाहीत, तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल. तसेच, पदोन्नतीसाठीही टीईटीची अट घालण्यात आली आहे. फक्त ज्या शिक्षकांच्या सेवेला पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांनाच काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, परंतु त्यांनाही पदोन्नतीसाठी ही परीक्षा पास करावीच लागणार आहे.
जुने शिक्षक संकटात
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो शिक्षक चिंतेत आहेत. विशेषतः २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. त्यावेळी 'टीईटी'ची अट नव्हती, त्यामुळे आता ही अट लावणे अन्यायकारक असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुशील पांडे आणि सचिव मनोज कुमार यांनी सांगितले की, ‘ज्या अटींवर शिक्षकांची नियुक्ती झाली होती, त्याच अटी त्यांच्यासाठी लागू राहिल्या पाहिजेत.’
शिक्षक संघांची भूमिका
शिक्षक संघांनी आता या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ते कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. संघाने केंद्र आणि राज्य सरकारांना जुन्या शिक्षकांची नोकरी आणि पदोन्नती सुरक्षित ठेवण्यासाठी सेवा नियमांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. तसेच, न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू केली आहे.
सरकारही कामाला लागले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक राज्यांची सरकारेही आता सक्रिय झाली आहेत. उत्तराखंड सरकारने टीईटी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण शिक्षकांचा तपशील मागवला आहे. तर, उत्तर प्रदेश सरकारही या परिस्थितीचा आढावा घेत आहे. सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांना थोडा दिलासा मिळाला आहे, पण जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत 'टीईटी'ची ही टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायम राहणार आहे.