...पण एका चुकीने सर्व अख्खे मुसळ गेले केरात
बीजिंग : जुन्या कादंबऱ्यांमधील गूढ कथा, साहस कथांच्या आहारी जाऊन एका बहाद्दराने प्रत्यक्षात एक प्राचीन थडगे फोडून खजिना लुटण्याचा धाडसी डाव खेळला. मात्र कोट्यवधींचा खजिना हाती आल्याचा त्याचा आनंद अल्पकाळ टिकला. लोभाच्या भरात केलेल्या एका घोडचुकीपायी त्याला तुरुंगवारी करावी लागली.
ही गोष्ट आहे चीनच्या हुबेई प्रांतातील यू नावाच्या एका अवली तरुणाची. हा तरुण प्राचीन थडग्यांचे वर्णन असलेल्या गूढ साहसी कादंबऱ्या वाचत असताना त्यातील रहस्यमय अवशेषांच्या नोंदी, गुप्त भुयारी मार्ग आणि शापित खजिन्याच्या कथा त्याच्या मनावर आपसूकच बिंबवल्या गेल्या. वाचनातून निर्माण झालेल्या वेडामुळे त्याने प्रत्यक्षात उत्खननाची तयारी सुरू केली. ऐतिहासिक नकाशे, सरकारी नोंदी आणि स्थानिक गोष्टींचा व लोककथांचा आधार घेत त्याने एका प्राचीन स्मशानभूमीत उत्खनन करण्याची गुप्त मोहिम आखली.
रात्रीच्या अंधारात सुरू केलेल्या या थरारक उत्खननानंतर त्याच्या हाती तब्बल २,७०० वर्षे जुन्या थडग्यातील २० प्राचीन कांस्य अवशेष लागले. खजिना हाती आल्यानंतर यू आणि त्याच्या साथीदारांनी त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रयत्नाने त्यांचा सर्व खेळ उधळला. एका मध्यस्थामार्फत खरेदीदार शोधताना पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले. खरेदीदाराच्या वेशात आलेल्या पोलिसांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये कारवाई करत यू व त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले आणि अवशेष जप्त केले.
दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने अखेर गेल्या महिन्यात याप्रकरणी निकाल देताना यू व त्याचा साथीदार चेन यांना प्रत्येकी दहा वर्षे तीन महिने कारावास आणि ७० हजार युआन दंड ठोठावला. तर मध्यस्थ लीला तीन वर्षे सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अभ्यास केल्यानंतर जप्त खजिन्यांतील तब्बल नऊ वस्तूंना राष्ट्रीय प्रथम श्रेणी सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळाल्याचे तज्ज्ञांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. या खजिन्याची किंमत तब्बल पाच कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.