भारताच्या लोकसंख्येची वृद्धत्वाकडे झपाट्याने वाटचाल

SRS अहवालातून धक्कादायक वास्तव आले समोर!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th September, 04:34 pm
भारताच्या लोकसंख्येची वृद्धत्वाकडे झपाट्याने वाटचाल

नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या आता हळूहळू वृद्धत्वाच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम (SRS) च्या २०२३ च्या अहवालातून मिळाले आहेत. भारतातील मुलांची संख्या सतत कमी होत असल्याचे, प्रजनन दर ऐतिहासिक नीचांकीवर पोहोचल्याचे, कामकाजी वयोगट झपाट्याने वाढत असल्याचे आणि वृद्धांची टक्केवारीही वाढत असल्याचे या अहवालातून निदर्शनास आले आहे.

देशात ० ते १४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येचा वाटा १९७१ मध्ये ४१.२ टक्के इतका होता, मात्र २०२३ मध्ये तो घसरून फक्त २४.२ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच देशातील लहान मुलांची संख्या वेगाने घटत आहे. त्याचबरोबर, १९७१ मध्ये ५.२ टक्के इतका असलेला प्रजनन दर २०२३ मध्ये फक्त १.९ टक्के इतका राहिला आहे. ग्रामीण भागात पहिल्यांदाच प्रजनन दर २.१ पर्यंत खाली आला आहे. हे बदल भारताच्या लोकसंख्यावाढीचा वेग कमी होत असल्याचे आणि देश झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल करत असल्याचे सूचक आहेत.

कामकाजी वयोगटात मात्र उलट चित्र दिसते. १५ ते ५९ वर्षांच्या लोकसंख्येचे प्रमाण १९७१ मधील ५३.४ टक्क्यांवरून २०२३ मध्ये तब्बल ६६.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच भारतातील कामकाजी लोकसंख्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. दिल्ली, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे कामकाजी वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक असून बिहारमध्ये ते सर्वात कमी आहे. शहरी भागात हा गट ६८.८ टक्के आहे, तर ग्रामीण भागात तो ६४.६ टक्के आहे. या प्रवृत्तीमुळे भारताकडे प्रचंड मॅन फोर्स उपलब्ध झाली आहे; मात्र याच काळात लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकू लागल्याने लोकसंख्येचा लाभ (Demographic Dividend) घेणे टिकवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांची टक्केवारी २०२३ मध्ये ९.७ इतकी झाली आहे. केरळ (१५.१ टक्के), तमिळनाडू (१४ टक्के) आणि हिमाचल प्रदेश (१३.२ टक्के) ही राज्ये वृद्धांची सर्वाधिक टक्केवारी असलेली ठरली आहेत. त्यामुळे वृद्धांच्या आरोग्यसेवा, निवृत्ती नियोजन आणि सामाजिक सुरक्षा या विषयांना पुढील दशकांत प्राधान्य देणे आवश्यक ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रातील काही आकडेवारी मात्र सकारात्मक चित्र दाखवते. शिशुमृत्यू दर २०१८ मधील ४० वरून कमी होऊन २०२३ साली २५ प्रति १ हजार जन्मांवर आला आहे. त्याचबरोबर, आयुर्मानातही लक्षणीय वाढ झाली आहे. १९७०-७५ मध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान ४९.७ वर्षे इतके होते, ते २०१८-२२ या कालखंडात ६९.९ वर्षांवर गेले आहे. याचा अर्थ आरोग्य सुविधा आणि जीवनमानात सुधारणा झाली आहे; मात्र याच सुधारण्यामुळे वृद्धांची संख्या वाढत असल्याचेही स्पष्ट दिसते.

या अहवालासाठी तब्बल ८८ लाख इतकी लोकसंख्या नमुन्यात अभ्यासासाठी ग्राह्य धरण्यात आली असून हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्यात्मक सर्वेक्षणांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे, बहुतांश राज्यांमध्ये ०-१४ वर्षे वयोगटात मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे. मात्र, दिल्लीच्या ग्रामीण भागात याउलट चित्र दिसते, जिथे मुलींचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा