धमकीत मानव बॉम्ब, ४०० किलो आरडीएक्सचा उल्लेख; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहर हाय अलर्टवर
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेने मुंबईत तब्बल ३४ ‘मानवी बॉम्ब’ द्वारे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिल्यानंतर संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेकडून मिळालेल्या धमकीत ३४ वाहनांमध्ये ३४ मानव बॉम्ब पेरल्याचा दावा करण्यात आला असून त्यांच्या जवळ सुमारे ४०० किलो आरडीएक्स असल्याचे सांगण्यात आले आहे. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरेल आणि कोट्यवधी लोकांचे प्राण धोक्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आली असून, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केल्या आहेत.
मुंबईत यापूर्वी १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याची भीषण आठवण अजून ताजी असतानाच पुन्हा अशा धमक्या येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कलवा रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. रूपेश मधुकर रणपिसे (४३) असे त्याचे नाव असून त्याने रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर फोन करून स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले होते. मात्र तपासाअंती ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी बॉम्ब पथक, श्वान पथक आणि सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपासणी करून ही धमकी निराधार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबईत मात्र लष्कर-ए-जिहादी संघटनेकडून आलेल्या नव्या धमकीला गृहीत धरून पोलीस प्रशासनाने शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविला आहे. वाहतूक, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बाजारपेठा आणि समुद्रकिनाऱ्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या धमकीची शहानिशा करत असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.