प्रकरणाचा आवाका बराच मोठा; क्लिष्ट प्रक्रियांद्वारे (लेयरिंग) अवैध पैसा लपवण्याचा प्रयत्न.
बंगळुरू : बंगळुरू व चालकेरे (जिल्हा चित्रदुर्ग) येथे मंगळवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार के. सी. वीरेंद्र ऊर्फ पप्पी यांच्या ठिकाणांवर धाड टाकली. अवैध ऑनलाईन व ऑफलाईन सट्टेबाजी प्रकरणात पीएमएलए कायदा, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात पाच हाय-एंड गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यात मर्सिडीज बेंझसह व्हीआयपी क्रमांकाच्या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तब्बल ५५ कोटी रुपयांची रक्कम असलेले बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात ४०.६९ कोटी रुपये नऊ बँक खात्यांमध्ये व एक डिमॅट खात्यात असल्याचे उघड झाले. तसेच १४.४६ कोटी रुपये सुमारे २६२ म्युल खात्यांमधून जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली.
वीरेंद्र पप्पी व त्यांचे सहकारी King567, Raja567, Lion567 अशा नावाने अनेक सट्टेबाजीची संकेतस्थळे चालवत होते. या संकेतस्थळांमधून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार अल्पावधीत झाल्याचे समोर आले आहे अशी माहिती ईडीने दिली. मिळालेला निधी विविध गेटवे व बोगस खात्यांद्वारे वळवून हवालामार्गे परदेशात पाठविण्यात येत असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला.
ईडीच्या तपासानुसार, दुबईतील Castle Rock Project Management Services व Lascaux Core Project Management Services यांसारख्या कंपन्यांमध्ये वीरेंद्र पप्पी, त्यांचा भाऊ के. सी. थिप्पेस्वामी, पुतण्या पृथ्वी एन. राज उर्फ अप्पू, अनिल गौडा यांचा सहभाग आहे. या माध्यमातून मिळालेला सर्व अवैध निधी अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेद्वारे (लेयरिंग) लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आढळले. सध्या आमदार वीरेंद्र पप्पी ईडीच्या कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.