भोपाळ : मेंदूला मुंग्या आणणारी एक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडली आहे. ८० हजार रुपये लुटण्याच्या प्रयत्नात तीन चोरट्यांना आपली तब्बल २ लाख रुपये किमतीची बाईक सोडून पळ काढावा लागला. चोरी यशस्वी झाली, पण ऐनवेळी बाईकने दगा दिल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले आणि त्यांना स्वतःच मोठे नुकसान सोसावे लागले
ही घटना भोपाळमधील अयोध्या नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. नीरज नावाचे किराणा दुकानदार आपली दुकान बंद करून ८० हजार रुपयांची रोकड घेऊन घरी परतत होते. एका कॉन्व्हेंट शाळेजवळ मागून आलेल्या तीन बाईकस्वारांनी त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. झटापटीत नीरज खाली पडले आणि चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला.
सगळे काही ठरल्याप्रमाणे घडत होते, पण नियतीला वेगळेच काहीतरी मान्य होते. बॅग घेऊन पळत असताना, चोरट्यांची बाईक बंद पडली. त्यांनी ती सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाईक काही केल्या सुरू झाली नाही. त्याच वेळी नीरज यांनी आरडाओरड सुरू केल्याने आसपासचे लोक जमा होऊ लागले. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी ८० हजार रुपयांची बॅग आणि आपली २ लाख रुपये किमतीची बाईक तिथेच सोडून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच अयोध्या नगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ती बाईक जप्त केली. पोलिसांनी सांगितले की, बाईकच्या नंबरवरून चोरट्यांची ओळख पटली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल. ८० हजार रुपयांच्या लुटीसाठी २ लाखांचे नुकसान करून घेणाऱ्या या चोरट्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.