राज्यातील खड्ड्यांमुळे त्रासलेल्या नेटकऱ्यांचा सूर
पणजी : मुसळधार पावसामुळे गोव्यातील रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. महामार्ग असो किंवा अंतर्गत राज्यमार्ग सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे गोव्यातील रस्ते पुण्यातील ‘जंगली महाराज’ रस्त्याच्या धर्तीवर करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यातील खड्डेमय रस्ते हा नवा विषय नाही; मात्र यंदा परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. काही ठिकाणी तर रस्ते ओळखू न येण्याइतपत खड्ड्यांनी भरून गेले आहेत. दुचाकीस्वार, कारचालक, ट्रकचालक सर्वांनाच या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक अपघात घडून नागरिकांना प्राणही गमावावे लागले आहेत. सध्या सरकारने रस्त्यावर पडलेल्या खड्डेमय रस्त्यांची माहिती मागविली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील जंगली महाराज मार्ग चर्चेत आला होता. कारण, या मार्गावर गेल्या ५० वर्षांत एकही खड्डा पडलेला नाही. या मार्गाचे भ्रष्टाचारमुक्त यंत्रणेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून संपूर्ण भारतात कौतुकही झाले होते. यामुळे गोव्यातील नागरिक व नेटकरी यांची सरकारकडे मागणी आहे की, गोव्यातील रस्त्यांची देखभाल आणि गुणवत्ता देखील ‘जंगली महाराज’च्याच धर्तीवर व्हावी.
सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पुण्यातील रस्ता इतका टिकाऊ असू शकतो, तर गोव्यातील का नाही? काहींनी तर रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सरकारी यंत्रणांनी याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
पर्यटनावरही विपरित परिणाम
रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे केवळ वाहतुकीत अडथळे निर्माण होत नाहीत, तर राज्यातील पर्यटनावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगतात. गोवा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर पहिली छाप रस्त्यांवरूनच पडते. खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि राज्याची प्रतिमा ढासाळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जंगली महाराज मार्गाचा आदर्श घेऊन टिकाऊ, दर्जेदार व खड्डेमुक्त रस्ते बांधले, तरच गोव्याची खरी प्रगती होईल, असे नेटकरी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे.
जंगली महाराज रस्त्याचा इतिहास
१९७३ मध्ये पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने शहरातील रस्त्यांचे तीन-तेरा वाजले. रस्ते उखडले गेले, खड्ड्यांनी व्यापले गेले आणि नागरिकांचा संताप वाढला. त्या काळात नगरसेवक श्रीकांत शिरोळे यांनी पावसाला दोष देणाऱ्या प्रशासनावर टीका केली. त्यांनी मुंबईतील दर्जेदार रस्त्यांचे उदाहरण देत पुण्यातील रस्त्यांची गुणवत्ता का कमी आहे, असा सवाल उपस्थित केला. अवघ्या २४ व्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष बनलेल्या शिरोळे यांनी यावर उपाय शोधण्याचा निर्धार केला.
श्रीकांत शिरोळे यांनी रस्त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेकॉन्डो कंपनीचा शोध लावला. या कंपनीचे संचालक, दोन पारशी बंधू, यांनी हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ रस्ते बांधण्याची हमी दिली. जंगली महाराज रस्त्याच्या बांधणीसाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आणि कामाला सुरुवात झाली. रेकॉन्डोने असे तंत्रज्ञान वापरले की, रस्त्यावर १० वर्षांत एकही खड्डा पडणार नाही, अशी ग्वाही दिली. १ जानेवारी १९७६ रोजी हा रस्ता पूर्ण झाला, आणि तो आजही पुण्याचा अभिमान आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, जंगली महाराज रस्त्यावर गेल्या ५० वर्षांत एकही खड्डा पडला नाही. २०१३ मध्ये केवळ रस्त्याच्या कडेला किरकोळ डागडुजी करावी लागली, पण मुख्य रस्ता आजही भक्कम आहे. रेकॉन्डोच्या हॉट मिक्स तंत्रज्ञानाने इतर ठेकेदारांना प्रेरणा दिली, पण त्याचवेळी पारशी बंधूंमधील वादामुळे कंपनीने नवीन कामे घेणे बंद केले. यामुळे पुण्याला असे आणखी रस्ते मिळाले नाहीत, पण जे.एम. रस्त्याने इतिहास रचला.
जंगली महाराज रस्त्याची गाथा आजच्या काळातही रस्तेबांधणीसाठी प्रेरणादायी आहे. रेकॉन्डोने वापरलेले हॉट मिक्स तंत्रज्ञान आणि श्रीकांत शिरोळे यांचा दृष्टिकोन यांनी पुण्याला एक असा रस्ता दिला, जो ५० वर्षांनंतरही खड्ड्यांपासून मुक्त आहे. आजच्या ठेकेदार आणि प्रशासनाने यातून बोध घेऊन टिकाऊ रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. जे.एम. रस्ता हा केवळ रस्ता नाही, तर पुण्याच्या विकासाचा आणि दूरदृष्टीचा प्रतीक आहे.जंगली महाराज रस्त्याने पुण्याच्या रस्तेबांधणीच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले आहे