हॉटमिक्स प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती

दिगंबर कामत : रस्ता स्थितीच्या आढाव्यासाठी लवकरच बैठक


17 hours ago
हॉटमिक्स प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पावसामुळे हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यासाठी अडचणी येत आहेत. हॉटमिक्स प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. खात्याच्या अभियंत्यांकडून अहवाल आल्यानंतर रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी बैठक होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
पावसामुळे राज्यातील बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खात्याचा ताबा स्वीकारल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी अभियंत्यांकडून स्थिती जाणून घेतली. अभियंत्यांनी खात्याच्या कार्यपद्धतीविषयी सादरीकरण केले. कोणत्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि कोणत्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालावर मंत्री दिगंबर कामत बैठक घेतील. बैठकीनंतर खड्डे भरण्यासाठी, रस्ते दुरुस्तीसाठी योग्य ते आदेश जारी केले जातील.
रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी हॉटमिक्स प्रकल्प (प्लांट) सुरू होणे आवश्यक असते. पाऊस असताना हॉटमिक्स प्रकल्प सुरू करणे शक्य होत नाही. डांबरामध्ये पाणी जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मान्सूनचे राज्यातून निर्गमन झाल्यानंतर हॉटमिक्स प्रकल्प सुरू होतील. हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य होईल, असे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

हेही वाचा