मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार, मात्र नियुक्ती अजूनही नाही

पणजी : समग्र शिक्षण अभियानांतर्गत ७०० कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती अर्थ खात्याची मान्यता न मिळाल्यामुळे रखडली आहे. या पदांसाठी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांची यादी देखील तयार झाली आहे. मात्र मान्यता न मिळाल्याने नियुक्तीपत्रे देणे शक्य झालेले नाही, अशी माहिती समग्र शिक्षण अभियानाचे प्रमुख शंभू घाडी यांनी दिली.
राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू असून शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळाने समग्र शिक्षण अभियानांतर्गत ७०० शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. या भरतीसाठी २१ मे रोजी जाहिरात काढण्यात आली होती.
२६ मे ते ३० मे या कालावधीत थेट मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया जुलै महिन्यात पूर्ण झाली.
सर्व पदे कंत्राटी पद्धतीची असून, शिक्षकांना दरमहा २० हजार रुपये वेतन मिळणार आहे. नियुक्ती एक वर्षासाठी असेल. एकूण ७०० पदांपैकी ३७१ पदे सर्वसामान्यांसाठी, तर उर्वरित पदे आरक्षित आहेत. अनुसूचित जाती (एससी) साठी १४ पदे, अनुसूचित जमाती (एसटी) साठी ८४ पदे, इतर मागास वर्गीय (ओबीसी) साठी १८९ पदे, दिव्यांगांसाठी ३५ पदे, माजी सैनिकांसाठी ७ पदे आरक्षित आहेत. किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आणि डीएड, तसेच कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. या पदांसाठी सुमारे ३ हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मात्र तीन महिने उलटूनही नियुक्ती न झाल्याने उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे.
ज्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे, तिथे या कंत्राटी शिक्षकांची तातडीची गरज आहे. मात्र शिक्षण वर्ष सुरू होऊन चार महिने उलटून गेले तरी शिक्षकांची नेमणूक न झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
कर्मचारी निवड आयोगाकडून कायम भरती
आता शिक्षकांची कायमस्वरूपी भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत करण्यात येणार आहे. मात्र जाहिरात, अर्ज प्रक्रिया, परीक्षा व नियुक्ती या टप्प्यांना वेळ लागणार असल्याने तातडीने शिक्षकांची उपलब्धता शक्य नाही. त्यामुळेच समग्र शिक्षण अभियानांतर्गत कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ७०० शिक्षकांव्यतिरिक्त १४९ संगीत, फाईन आर्ट्स व एनएसक्यूएफ इन्स्ट्रक्टर पदांसाठी ही समग्र शिक्षण अभियानाने स्वतंत्र जाहिरात काढली आहे. या पदांसाठी संबंधित विषयात पदवी ही आवश्यक पात्रता आहे.