मंदिरात वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद

दामू नाईकांना घेरले : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस नेत्यांची टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
मंदिरात वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी वाढदिवसाचा केक हरवळे येथील रुद्रेश्वर मंजदरात कापल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या भाजपकडून हिंदू धर्माचा अपमान झाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानेही केक कापण्यावर टीका केली.
शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस हरवळे येथील रूद्रेश्वर मंदीरात साजरा करण्यात आला. वाढदिनी दामू नाईक यानी रूद्रेश्वराची सपत्नीक पूजा केली. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इतर मंत्री व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंदीरात केक कापण्यात आला. मंदीरात केक कापण्याच्या प्रकारामुळे वादाला तोंड फुटले आहे.
काँग्रेसचे विधिमंडळ नेते युरी आलेमाव, प्रवक्ते सुनील कवठणकर, प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दामू नाईक आणि भाजपवर टीका केली आहे. हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणविणाऱ्या अध्यक्षांनी वाढदिवसाचा केक मंदिरात कापावा, हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असे काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
मंदीरात केक कापणे हा लाजीरवाणा प्रकार आहे. हा केक एगलेस (अंड्यांशिवाय) होता काय? हे स्वयंघोषित हिंदू रक्षणकर्ते आहेत. त्यांना हिंदू आणि त्यांच्या देवतांबाबत जराही आस्था नाही, हे यातून सिद्ध होते, असे सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे.
हरवळेतील श्री रुद्रेश्वर मंदिर हे भंडारी समाजाचे आराध्य व श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी राजकीय कार्यक्रम करू नये. अशा पवित्र जागेवर केक कापू नये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस साजरा करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपच्या इतर नेत्यांनी श्री देव रुद्रेश्वरच्या भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली.
विरोधकांकडून नाहक राजकारण : सिद्धेश नाईक
शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक वाढदिवसानिमित्त भंडारी समाजाचे आराध्य दैवत्य श्री रुद्रेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मंदिराच्या सभागृहात वाढदिवस साजरा केला. हा कार्यक्रम मंदिरात नसून मंदिराच्या सभागृहात झाला आहे. या सभागृहात ‘आप’चे अॅड अमित पालेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला होता, हे त्यांनी विसरू नये. विरोधकांना आणखी विषय नसल्याने ते केक कापण्यावरून राजकारण करत आहेत, अशी सारवासारव जि. प. सदस्य सिद्धेश नाईक यांनी केली आहे.