रोहन गटाला भाजपचा पाठिंबा : माजी मातब्बर पदाधिकारी चेतन देसाई यांच्या गटात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या रोहन गावस देसाई गटासमोर चेतन देसाई गटाचे आव्हान आहे. सध्याचे अध्यक्ष विपूल फडके, सूरज लोटलीकर, अकबर मुल्ला, विनोद ऊर्फ बाळू फडके हे मातब्बर विरोधात असल्यामुळे रोहन गावस देसाई गटाला निवडणूक जिंकणे तितके सोपे राहणार नाही, असे वातावरण आहे.
महेश देसाई हे चेतन देसाई गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. महेश कांदोळकर हे रोहन गावस देसाई गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. गोय क्रिकेट संघटनेची निवडणूक १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. १० सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल, तर ११ सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. काही जण अर्ज मागे घेऊन अन्य उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे १०७ सदस्य आहेत. या सर्व क्लबचे प्रतिनिधी मतदानात सहभागी होणार आहेत.
गोवा क्रिकेट संघटनेत चेतन देसाई, विनोद ऊर्फ बाळू फडके, सूरज लोटलीकर, अकबर मुल्ला बरीच वर्षे पदाधिकारी होते. त्यांना बऱ्याच क्लबचा पाठिंबा आहे. या पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत रोहन गावस देसाई तसेच अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर हे नवे आहेत. सरकार तसेच भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा रोहन गावस देसाई गटाला आहे. दोन्ही गटांनी क्लबच्या सदस्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून प्रचाराला प्रारंभ केला आहे.
मी भारतीय जनता पक्षाचा मागील अनेक वर्षांपासून सदस्य आहे. माझा रोहन गावस देसाई गटाला पाठिंबा आहे. मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. एका पदासाठी अर्ज मी मागे घेईन. रोहन गावस देसाई गटाच्या सदस्यांसोबत चर्चा करून मी निर्णय घेईन.
_ राजेश पाटणेकर
गोवा क्रिकेट संघटणेला सुसज्ज अशा स्टेडियमची गरज आहे. यापूर्वीच्या समित्यांना स्टेडियमविषयी निर्णय घेण्यात अपयश आले. निवडून आल्यानंतर स्टेडियमविषयी लवकरात लवकर निर्णय आम्ही घेऊ. मतदान करणाऱ्या क्लबना आम्ही हेच आश्वासन दिले आहे.
_ रोहन गावस देसाई
क्रिकेटच्या क्षेत्रात मागील ४० वर्षांपासून माझा वावर आहे. जीसीएसाठी मी केलेले काम सर्व क्लबना माहिती आहे. जीसीएच्या कार्याला गती देऊन क्रिकेट पुढे नेण्यासाठी मी निवडणूक लढत आहे.
_ महेश कांदोळकर
जीसीएचा राजकारणाशी संबंध नाही : विपूल फडके
चेतन देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला अधिक क्लबांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आमच्या पॅनलचा कोणत्याच नेत्यासोबत संबंध नाही. जीसीए ही खेळाविषयीची संघटना आहे. तिचा राजकारणाशी संबंध असू नये, असे मत जीसीएचे विद्यमान अध्यक्ष विपूल फडके यांनी व्यक्त केले.