वाघांसाठी माणसांवर अन्याय : लोकवस्त्यांना मूलभूत सुविधा नाकारण्याचे प्रकार
जोयडा : काळी व्याघ्र अभयारण्य हे निसर्गाचे हिरवे सोने आहे. पण या हिरव्या जंगलात पिढ्यानपिढ्या निसर्गाशी एकनिष्ठ राहणाऱ्या माणसाचे अस्तित्व मात्र हळूहळू पुसले जात आहे. वन्य प्राणी वाचवण्याच्या नावाखाली जंगलातील लोकवस्त्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. परिणामी, वाघासाठी राखलेल्या या जंगलात माणसांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
गोवा सीमेवरील बाजारकोनांग पंचायत क्षेत्रातील गावे दरवर्षी पावसाळ्यात जगापासून तुटतात. बाजारकोनांग–डीग्गी रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो. या रस्त्यावरील गडावळी जवळ नदीवर पूल नसल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. करंजे–दूधमाळ रस्त्यावर सुपा धरणाचे बॅकवॉटर भरल्याने येथे प्रवासासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे किंदळे, असुळी, करंजे, पाडशेत, मायरे, कडणे, डीग्गी, दूधमाळ, सिसये, सोलीये, बोन्डेली ही गावे महिनो महिने संपर्कहीन बनतात. शाळकरी मुले, वृद्ध, रुग्णांचे हाल
रस्ते नाहीत, त्यामुळे वाहतूक सेवा नाही, त्यामुळे येथील शाळकरी मुलांना अंधारात, पावसात जंगल ओलांडून शिक्षणासाठी प्रवास करावा लागतो. पेन्शनधारक, रुग्ण, वृद्ध, अपंग यांचे हाल होतात. या गावांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचत नाही. किराणा, बाजारातील साहित्य डोक्यावर वाहून नेण्याशिवाय येथील लोकांना पर्याय नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. ‘ग्रामवास्तव्य‘, ‘जिल्हाधिकाऱ्यांचे पाय गावाकडे’, यांसारखे उपक्रम प्रत्यक्षात अपयशी ठरले आहेत. “डिजिटल इंडिया”च्या जगात ही मुले आजही ‘जंगल इंडिया’मध्ये जगत आहेत, ही खंत स्थानिक व्यक्त करतात.
बाजारकोनांग पंचायत क्षेत्रातील गावे पावसाळ्यात संपर्कहीन.
काही गावांसाठी बोटीचे एकमेव साधन. मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव.
सरकारी योजना गावाच्या दारात पोहोचत नाहीत. नेटवर्क समस्या कायम.