धर्मापूर कोमुनिदादने कचरा प्रकल्पाची जागा घेतली परत

अटींचे पालन न केल्याचा ठपका : भागधारकांचाही होता आक्षेप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
धर्मापूर कोमुनिदादने कचरा प्रकल्पाची जागा घेतली परत

मडगाव : धर्मापूर पंचायतीला कोमुनिदादकडून उपलब्ध करून दिलेली जागा परत घेण्यात आली आहे. हा निर्णय कोमुनिदाद समितीच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. कारण, जागा देताना घालण्यात आलेल्या अटींचे पालन झालेले नाही, तसेच भागधारकांमध्येही विरोधाची नोंद झाली होती.
धर्मापूर कोमुनिदादची सर्वसाधारण सभा रविवारी समितीच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. बैठकीत समितीचे सदस्य आणि दोन भागधारक उपस्थित होते. कोरम पूर्ण न झाल्यामुळे संचालकांकडून ही सभा पार पडली. या बैठकीत दर बुधवारी धर्मापूर मार्केटसाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी चर्चेला आली. यावर २०० रुपयांवर दर बुधवारी मार्केटला जागा देण्याची परवानगी देण्यात आली आणि कायमस्वरुपी बांधकाम न करण्याची अट ठेवण्यात आली.
त्याचबरोबर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी धर्मापूर सिर्ली पंचायतीकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही चर्चेला आली. पंचायतीने ५ हजार चौ.मी. जागा मागितली होती, मात्र कोमुनिदाद समितीने २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली. या जागेबाबत ग्रामसभेत काही लोकांनी आक्षेप घेतला. ही जागा डोंगराखाली असल्याने डोंगरावरून येणारे पाणी व कचर्‍याचे सांडपाणी शेतात व गावात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. बैठकीत उपस्थित भागधारकांनीही या जागेबाबत आक्षेप नोंदवला. त्यामुळे समितीने जागा परत घेण्याचा निर्णय घेतला.
अध्यक्ष फ्रान्सिस्को डायस आणि अ‍ॅटर्नी कार्मिनो रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, धर्मापूर पंचायतीला जागा देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. प्रकल्पासाठीच्या जागेकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने जलस्त्रोत खात्याची परवानगी घेऊन तीन महिन्यांत रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच प्रदूषण मंडळ, जलस्त्रोत खाते आणि वन खात्याकडून ना हरकत दाखले मिळवणे या अटी होत्या. परंतु, या अटींचे पालन झालेले नाही, तसेच भागधारकांचा विरोध असल्यामुळे ही जागा परत घेण्यात आली आहे.