राज्य सहकारी बँक आता डिजिटल सेवांवर देणार भर

अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर : अार्थिक स्थिती घाबरण्यासारखी नाही


17 hours ago
राज्य सहकारी बँक आता डिजिटल सेवांवर देणार भर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा राज्य सहकारी बँक आता डिजिटल सेवांवर भर देणार आहे. बँकेने एटीएम कार्ड सुरू केले आहे. आता गुगल पे, पेटीएम सारख्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. बँकेची अार्थिक स्थिती घाबरण्यासारखी नाही, असे प्रतिपादन गोवा राज्य सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर यांनी केले.
गोवा राज्य सहकारी बँक ही राज्यातील शिखर बँक आहे. राज्यातील ही सर्वांत मोठी सहकारी बँक आहे. कामकाजात सुधारणा करण्यासह सेवांचा विस्तार करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन बँका बंद पडल्या. काही वर्षांपूर्वी गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती गंभीर झाली होती; मात्र सरकारने आर्थिक मदत करून बँकेला आधार दिला. मी अध्यक्ष म्हणून नुकताच निवडून आलो आहे. बँकेच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्यात येईल. सरकार तसेच तज्ज्ञांची मदत घेऊन बँकेविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, असे कुर्टीकर यांनी सांगितले.
राज्यातील सर्व मुख्य शहरांत बँकेच्या शाखा आहेत. सर्व शाखांचे व्यवहार उत्तम आहेत. बिगर भांडवली मालमत्ता (एनपीए) पाचपेक्षा कमी आहे. खनिज व्यवसाय बंद पडल्याचा बँकेला फटका बसला होता. कर्जाची वसुली होणे कठीण झाले होते. खनिज व्यवसाय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे खाण क्षेत्रातील शाखांचे व्यवहार वाढणार आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या समाधानकारक आहे. जुने कर्मचारी दर महिन्याला निवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेहून अधिक वाढणार नाही. डिजिटल सेवा सुरू करून चांगली सेवा देण्याला प्राधान्य राहील. नवे उपक्रम आणि दर्जेदार सेवा दिली तर बँकेची निश्चित प्रगती होईल, असेही अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर यांनी सांगितले.
राज्यातील खनिज व्यवसाय बंद पडल्याचा बँकेला फटका बसला होता. खनिज व्यवसाय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे खाण क्षेत्रातील बँकेच्या शाखांचे व्यवहार वाढण्याची अपेेक्षा आहे. डिजिटल सेवा सुरू करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याला प्राधान्य दिले जाईल. नवे उपक्रम आणि दर्जेदार सेवा दिली तर बँकेची निश्चित प्रगती होईल.
_ पांडुरंग कुर्टीकर, अध्यक्ष, गोवा राज्य सहकारी बँक