घेतला कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा
वास्को: सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी सकाळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्यासह बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि वास्को मतदारसंघातील प्रलंबित रस्ते, पाणीपुरवठा व इतर विकासकामांची माहिती घेतली.
एखाद्या भागात कार्यक्रमासाठी गेलो असता स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्या समस्या समजून घेणे ही माझी सवय आहे. 'एमईएस कॉलेज'मधील एका कार्यक्रमासाठी मी इथे आलो होतो, असे पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले. स्थानिक आमदार कृष्णा साळकर यांच्या विनंतीनुसार, आम्ही एकत्र येऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यापूर्वीच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून रस्त्यांची सविस्तर माहिती मागवली आहे, असे वास्कोमधील रस्त्यांच्या स्थितीबद्दल बोलताना कामत यांनी सांगितले. वास्कोमधील रस्ते फारसे खराब नाहीत, परंतु ज्या ठिकाणी भूमिगत केबल्स टाकण्यात आल्या आहेत, तेथील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे असे आमदार साळकर यांनी सांगितले. कामत यांनी हॉटमिक्स प्लांट सुरू झाल्यावर ही कामे लवकरच हाती घेण्याचे आश्वासन दिले.
आमदार कृष्णा साळकर यांनी या कामत यांनी दिलेल्या भेटीचे स्वागत केले. त्यांनी एफ. एल. गोम्स रोड आणि स्वातंत्र्य पथ येथील रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरच आपल्या कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. साळकर यांनी स्थानिकांना जाणवणाऱ्या पाणी आणि रस्त्यांशी निगडीत समस्यांची माहिती कामत यांना दिली असून, अनुभवी मंत्री असल्याने त्या लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. संबंधित विभागाने या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश कामत यांनी दिले आहेत.