हॉस्पेट ते वास्को रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला आता चर्चचाही तीव्र विरोध

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 04:57 pm
हॉस्पेट ते वास्को रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला आता चर्चचाही तीव्र विरोध

पणजी : हॉस्पेट ते वास्को रेल्वे मार्गाच्या  दुपदरीकरणामुळे कोळशाची वाहतूक वाढणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असले, तरी आता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप या विरोधी पक्षांनंतर चर्चनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. चर्चच्या या भूमिकेमुळे या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

'हा प्रकल्प राज्याच्या हिताचा नाही आणि यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ९ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाची पर्यावरणविषयक मंजुरी रद्द केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने (CEC) या प्रकल्पाला 'अकार्यक्षम' आणि 'पर्यावरणाच्या दृष्टीने विनाशकारी' म्हटले होते, असे चर्चच्या पर्यावरणीय आयोगाचे निमंत्रक, फादर डॉ. बोलमॅक्स परेरा यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.

या प्रकल्पाला गोव्यातील जनतेचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. अनेक स्थानिक समुदाय, पर्यावरण कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी यापूर्वीही निदर्शने केली आहेत. या दुहेरीकरणामुळे कोळशाच्या धुळीमुळे हवा प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. तसेच, जुनी घरे, ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होतील, ज्यामुळे गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा धोक्यात येईल, असे फादर परेरा यांनी पुढे सांगितले.

न्यायालयाच्या निकालाकडे आणि जनतेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पाचा पाठपुरावा करणे हे कायद्याचे राज्य आणि लोकशाहीचा अनादर आहे. आम्ही आमच्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आणि तो केवळ तात्पुरत्या आर्थिक फायद्यांसाठी बळी न देण्यासाठी नेहमीच आवाज उठवत राहू, असे ते म्हणाले.

हेही वाचा