पणजी : हरियाणाच्या भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या खूनप्रकरणातील संशयित सुखविंदर सिंग याला उत्तर गोवा सत्र न्यायालयाने परदेश प्रवासाची परवानगी दिली आहे. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो दोन आठवड्यांसाठी बाली इंडोनेशियाला जाणार आहे.
सुखविंदर सिंगने ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान बाली (इंडोनेशिया) येथे जाण्याची विनंती केली होती. सुरुवातीला सरकारी पक्षाने या प्रवासाच्या तपशीलांबाबत हरकत घेतली होती. मात्र, सुखविंदरने तपशीलवार प्रवास आराखडा सादर केला. त्यानंतर सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी प्रवासास परवानगी देत काही अटी घातल्या. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रवासानंतर सुखविंदरने तातडीने पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा, आपले संपर्क तपशील द्यावेत आणि २४ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
फोगाट मृत्यू प्रकरणाची पार्श्वभूमी
२२ ऑगस्ट २०२२ रोजी सोनाली फोगाट गोव्यात दाखल झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हणजुण येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार ' अनैसर्गिक मृत्यू’ म्हणून नोंदवण्यात आला. मात्र, नंतर पोलीस आणि सीबीआयच्या तपासात फोगाट यांना एमडीएमए दिल्याचे समोर आले.होते.
हे अमलीपदार्थ सुखविंदर सिंग आणि फोगाटचा पर्सनल असिस्टंट सुधीर संगवान यांनी नाईट क्लब पार्टीदरम्यान दिल्याचा आरोप आहे.