रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाला चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

हडफडे येथील घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th September, 03:26 pm
रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाला चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

म्हापसा : रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलाला चुकवण्याच्या प्रयत्नात हडफडे येथे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायन आल्मेदा (वय ४५, रा. सोरांटोवाडो, हणजूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी हडफडे येथील ‘सॉल्ट रेस्टॉरंट’जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रायन आल्मेदा आपली दुचाकी घेऊन हडफडेहून हणजूणच्या दिशेने जात होते. रस्त्याच्या मधोमध एक बैल उभा होता. त्याला चुकवताना रायनच्या दुचाकीची बैलाच्या पायाला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या एका कारवर आदळली. या भीषण अपघातात रायन गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक स्वप्नील नाईक आणि हवालदार विशाल गावस यांनी पुढील तपास सुरू केला आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर रायन यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा