पुन्हा सत्ताप्राप्तीचे भाजपला वेध

२७ जागा गाठण्यासाठी भाजपला मगो, आप व आरजी या स्थानिक पक्षांचे अस्तित्व संपवावे लागेल, जे राजकीय वास्तवात अवघड आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहणार हे निश्चित.

Story: संपादकीय |
11 hours ago
पुन्हा सत्ताप्राप्तीचे भाजपला वेध

गोवा विधानसभेसाठीच्या निवडणुका २०२७ साली होणार असल्या तरी त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुरू झाली आहे. भाजपच्या पद्धतीनुसार, एक-दोन वर्षे आधीच तयारी करण्यास प्रारंभ झाला आहे. भाजपचे नवे आणि उत्साही अध्यक्ष दामोदर नाईक यांनी पक्षाला आगामी निवडणुकीत किमान २७ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केल्यानंतर, निवडणूक या विषयावर प्रथमच चर्चा सुरू झाली आहे. भाजपने २०२२ मध्ये २० मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. नंतर काँग्रेसमधील आमदारांना प्रवेश देत मगोसह एनडीएने आपली ताकद ३३ पर्यंत नेली. त्यामुळे राज्यात स्थिर सत्ता आहे, पण जनतेत नाराजीचे सूर का आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. सत्ता स्थिर, पण महागाई, बेरोजगारी, पर्यावरणीय प्रश्न, मोपा विमानतळ, खनिज पुनश्चलन, किनारी बांधकामे यामुळे जनतेत असंतोष दिसतो आहे का, यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. मजबूत संघटन आणि काँग्रेसमधील फूट भाजपला सतत फायद्याची ठरली आहे. काँग्रेसची स्थिती कमजोर, संघटन शिथिल आणि फोडाफोडीमुळे स्थानिक स्तरावर विश्वास कमी अशी अवस्था आहे. आम आदमी पक्षाला २०२२ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या, पण अजून संघटना बांधणीत तो पक्ष मागेच असल्याचे दिसते. असे असले तरी शहरी मतदार व युवा वर्गाचे त्या पक्षाबद्दलचे आकर्षण कायम आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगो आदी पक्षांजवळ ठोस भूमिका नाही. काही ठिकाणी मगोचे निश्चित मतदार आहेत, तरीही भाजपसोबत जागावाटप केले जाऊ शकते. काही स्वतंत्र उमेदवार कायम निर्णायक भूमिका बजावतात, कारण ते विजय किंवा पराभव कोणाचा होईल हे ठरवतात.

भाजपचे लक्ष्य २७ साली २७ जागा असे आहे, हे दामू नाईक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात काँग्रेसचे अस्तित्व फारसे जाणवत नाही, हे जसे एक कारण यामागे आहे, तसेच भाजपकडे पैसा, संघटन, केंद्राची ताकद, आणि डबल इंजिन सरकारचा मुद्दा आहे. स्थानिक पातळीवर भाजपने अनेक काँग्रेस नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यांची निष्ठा किती यापेक्षा त्यांची जिंकून येण्याची क्षमता पाहण्याची नवी पद्धत उमेदवारी देताना अवलंबिली जाते. जनतेमध्ये समाधान किती आणि असंतोष किती, यावरही चिंतन व्हायला हवे. खनिज उद्योग पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. कदाचित निवडणुकीपर्यंत हा उद्योग मार्गी लागला तर भाजपला त्याचा लाभ होईल. भाजप २०-२४ जागांवर सहज विजय मिळवेल असे वातावरण असले तरी मतदारांमध्ये नाराजी वाढली नाही तरच हे शक्य आहे, हेही खरे. २७ जागा गाठण्यासाठी भाजपला मगो, आप व आरजी या स्थानिक पक्षांचे अस्तित्व संपवावे लागेल, जे राजकीय वास्तवात अवघड आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहणार हे निश्चित असले तरी २७ जागा हे केवळ एक लक्ष्य म्हणून पाहावे लागते.

गोव्यातील ४० विधानसभा मतदारसंघांचे राजकारण खूप गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक पातळीवर कौटुंबिक राजकारण, समाज, धर्म व प्रादेशिक पक्ष यांची प्रभावी भूमिका असते. त्यादृष्टीने उत्तर व दक्षिण गोव्यातील मतदारसंघांवर नजर टाकावी लागेल. पणजीत भाजपची स्थिती मजबूत वाटते; थिवी, म्हापसा मतदारसंघ भाजपला अनुकूल असले तरी विद्यमान आमदारांबद्दलचे जनतेचे मत प्रतिकूल दिसते. कळंगुटवर भाजपची पकड असली तरी पर्यटन क्षेत्रातील मुद्दे नाराजी निर्माण करतात. पर्वरीत भाजपचे व सध्याच्या आमदाराचे वजन जाणवते. ताळगावमध्ये स्थानिक प्रभावी व्यक्ती निकाल ठरवते, हा आजवरचा अनुभव आहे. सांताक्रुझमध्ये पारंपरिकरीत्या काँग्रेस अथवा आप प्रभावी ठरेल. सांतआंद्रे मतदारसंघात नवे चेहरे उतरल्यास भाजपसाठी अवघड स्थिती दिसते. वाळपई, पर्ये, डिचोली, मये, मांद्रे, पेडणे त्याचप्रमाणे मडगाव, काणकोण, सांगे, कुडचडे आदी मतदारसंघात उमेदवार आणि त्यावेळची स्थिती यावर भवितव्य ठरणार आहे. फातोर्डा, कुडतरी, नुवे, बाणावली आदी मतदारसंघात भाजपचे स्थान नगण्य आहे. त्यामुळे नजरेसमोरील आकडा गाठण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. गुन्हेगारी, जमीन हडप प्रकरणे, नोकरीसाठी पैसे, भू-रूपांतरे आदी बदनामीकारक प्रकरणे जनतेच्या तोंडात घोळत असल्याने सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, यावरही मतदान अवलंबून 

असेल हे निश्चित.