ऑगस्ट महिन्यात उत्तर गोव्यातील पोलिसांनी अमली पदार्थांविरोधी जोरदार कारवाई करत सात गुन्हे दाखल केले आणि सात संशयितांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १९.६३ लाख रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले. यात ८.९३ लाखांचा ९.१९४ किलो गांजा, ६.०५ लाखांचा ६५ ग्रॅम हायड्रोपॉनिक गांजा,२.४० लाखांचे कोकेन, २५ हजारांचा अॅक्टसी ड्रग्जचा समावेश आहे. यामध्ये एका स्थानिक व्यक्तीसह एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे. कारागृहातून देखील काही ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गोव्याला 'ड्रग्जमुक्त' राज्य बनवण्यासाठी गोवा पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली आहे.
गोव्याच्या पर्यटन संस्कृतीला अमली पदार्थांचे ग्रहण लागले आहे. विशेषतः उत्तर गोव्यातील किनारी भागात ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत असून युवा पिढीही या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा पोलिसांनी विशेष पथके तयार करून ड्रग्जच्या खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सापळे रचून, गुप्त माहितीच्या आधारे आणि संशयित ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली जात आहे.
या कारवाया केवळ अमली पदार्थ बाळगणाऱ्या किंवा सेवन करणाऱ्यांवरच केंद्रित नाहीत, तर ड्रग्जच्या मोठ्या तस्करांना आणि पुरवठा साखळीला तोडण्याचे उद्दिष्ट आहे. नायजेरियन नागरिकाची अटक हे या आंतरराष्ट्रीय साखळीचे एक महत्त्वाचे टोक आहे. अशा तस्करांवर कारवाई केल्याने या व्यवसायाचे मूळ थांबवता येणे शक्य होईल. गोव्यातील स्थानिक तरुणांना आणि पर्यटकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. केवळ कायद्याची अंमलबजावणी करून ही समस्या पूर्णपणे संपुष्टात येणार नाही. त्यासाठी समाजानेही सहकार्य करणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, शिक्षण संस्थांनी जनजागृती मोहीम राबवणे आणि समाजाने अशा गुन्हेगारांना माहिती देणे महत्त्वाचे आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू ठेवून गोवा पोलिसांनी राज्याला अमली पदार्थांपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे.
उमेश झर्मेकर