भक्तीची थोरवी

कणसे घनदाट लागली आहेत पण त्यांच्यात जर दाणाच नसेल तर ती फुकटच नाही का? नगरी कितीही सुरम्य असली आणि जर तिथे जर लोकवस्तीच नसेल तर त्या नगरीचे आणि तिच्या सौंदर्याचे औचित्य ते काय?

Story: विचारचक्र |
11 hours ago
भक्तीची थोरवी

गेल्या भागात भगवद्गीतेतील आपण ९व्या अध्यायातील २९ व्या श्लोकाचा सरळ अर्थ पाहिला.

अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।

साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:।।३०।।

सरळ अर्थ : माझ्या भक्तीचा आणखीही एक प्रभाव ऐक - कोणी एखादा अतिशय दुराचारी जरी असला तरी जर तो अनन्यभावाने माझा भक्त बनून मला निरंतर भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे. कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे. अर्थात् त्याने असा निश्चय केलेला असतो की परमेश्वराच्या भजनासारखे दुसरे काहीही नाही.

विस्तृत विवेचन : अशा प्रेमभावाने जो माझी भक्ती करेल त्याला मागाहून परत जन्म नाही. मग त्याची जात, त्याचा वर्ण, त्याचे आचरण या गोष्टी कोण बघतो? तो कितीही नीच योनीचा, पाप राशीचा असला तरी "अंतीं मति जैसी, पुढे गति तैसी" या न्यायाने (सर्व करून सवरून ही) जो अंती भक्तीला वाहिलेला आहे. त्याचे केले-सवरलेले दुराचार शिल्लक रहात नाहीत. ते अंती-निर्धारित भक्तीमध्ये सामावून जातात. म्हणून तो (सुद्धा) सर्वोत्तम!

समजा एखादा कोणी महापुरात बुडाला, वाहून गेला, पण तरीही पोहत-पोहत, तगत-तरंगत जिवंत राहून शेवटी कुठे तरी त्यातून बाहेर तीरावर आला, तर तो बुडाला असे म्हणता येईल का? त्याप्रमाणे हे आर्जुना, जो भक्त ज्ञानी होतो त्याची सगळी दुष्कृते जळून जातात! म्हणून असा मनुष्य साधक व भक्त होण्या आधी जरी पापकर्ता असला, तरी माझ्या उपासनेच्या योगे पश्चात्तापरूपी तीर्थांत अवभृथ स्नान करून तो सर्वार्थाने पवित्र झालेला असतो. म्हणून त्याचे कूळ पवित्र म्हणायचे. त्याचा जन्म निर्मळ म्हणायचा. तोच जन्म घेऊन कृतार्थ झालेला आहे असे समजायचे. तोच सगळ्या शास्त्रार्थाचा ज्ञाता असतो असे बिनदिक्कतपणे समजावे. त्यानेच अष्टांग योग अभ्यासलेला असतो. त्यानेच चांगले तपाचरण केलेले असते. ज्याला माझी अखंड आवड असते तो कर्माचा पलिकडील तीर गाठतो.

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त: प्रणश्यति।।३१।।

सरळ अर्थ : म्हणून तो लवकरच धर्मात्मा होतो व सदा टिकून राहणारी परम शांती मिळवतो. हे अर्जुना, तू हे निश्चयपूर्वक सत्य समज की माझा भक्त नाश पावत नाही.

विस्तृत विवेचन : मन व बुद्धीचे सगळे व्यापार यथासांग पूर्ण करून त्यांचा अंतिम परिपाक म्हणून जो आपली सर्व निष्ठा माझ्या ठायी समर्पित करतो तो शेवटी मलाच येऊन मिळतो. हे पार्था, जो नेहमी अमृतच सेवन करून जगतो, तो कधी मरेल काय? ज्यावेळी आकाशात सूर्य उगवलेला नसतो त्या वेळेला रात्रीची वेळ आहे असे म्हणतात. तसे मग एखाद्याकडून माझ्या भक्तीव्यतिरिक्त जे जे काही कर्म घडत असेल ते ते सर्व महापाप, असा असा त्याचा अर्थ होतो काय? नाही. कारण आता त्याच्या चित्तास माझी जवळीक प्राप्त झाल्यानंतर तो तत्वतः माझेच स्वरूप होऊन जातो. आणि माझेच रूप होऊन राहतो!

एका दिव्याने दुसरा दिवा पेटवल्यानंतर दोन्ही दिव्यांकडे बघून त्यातला कोणता आधी लागलेला व कोणता नंतर हे ओळखता येते काय? नाही. तसेच मलाच सर्वस्व मानून जो मला भजतो तो मीच होऊन जातो, अर्जुना. मग माझी नित्य शांती, माझी स्थिती व माझी कांती म्हणजे माझे तेज हे सगळे त्याला प्राप्त होते. किंबहुना तो सर्वस्वी मीच होऊन जगत असतो. असा हा माझ्या अनन्य भक्तीचा परिणाम आणखी किती म्हणून विस्तारून सांगू तुला, अर्जुना?

एक महत्वाचे लक्षात ठेवायचे म्हणजे अशा वर सांगितलेल्या स्थितीची जर कोणी इच्छा करत असेल, तर त्याने भक्तीचा विसर पडू देऊ नये. कूळ निर्मळ कशामुळे होते? कुलीनत्व कशामुळे वाखाणले जाते?  पांडित्य, तारुण्य, सौंदर्य व संपत्ती या सर्व संपदेला माझ्या भक्तीची जोड अवश्य हवी. तीच जर नसेल तर ही सर्व संपदा फोल ठरते! कणसे घनदाट लागली आहेत, पण त्यांच्यात जर दाणाच नसेल तर ती फुकटच नाही का? नगरी कितीही सुरम्य असली आणि जर तिथे जर लोकवस्तीच नसेल तर त्या नगरीचे आणि तिच्या सौंदर्याचे औचित्य ते काय? दु:खी आणि कष्टी होऊन रानात हिंडणाऱ्याला दुसराही तसाच भेटावा, किंवा सरोवर मोठे असूनही त्यातले सगळे पाणी आटून गेलेले असावे, किंवा झाड फुलांनी बहरले आहे खरे पण, ती फुले वांझ निघावीत, किंवा सर्व अवयव असलेले शरीर आहे खरे पण त्यात जीवच नाही - तशातला तो प्रकार आहे. त्याप्रमाणे भक्तिवीण जीवन हे निरुपयोगी आहे. जमिनीवर दगड पाषाण काय कमी पडलेले असतात, निरुपयोगी होऊन? तसेच ते भक्तिविरहित जीवन.

हिंवरतरू नावाचे एक मोठे काटेरी झाड असते. त्याच्या छायेत बसले असता कुबुद्धी उत्पन्न होते अशी मान्यता आहे. म्हणून याची छाया निषिद्ध मानली जाते. म्हणून हिंवराच्या छायेत बसू नये असा सज्जनांचा संकेत आहे. त्याचप्रमाणे अभक्तांकडे जाऊ नये असा सगळ्या पुण्यांचा संकेत आहे. म्हणजे जो भक्त नसेल त्याच्याकडून पुण्यकर्में होणे कठीण असते. निंबवृक्ष कितीही निंबोळ्यांनी ओथंबून आला तरी त्यांचा उपयोग कुणाला? फक्त कावळ्यांना! तसे जो अभक्त आहे त्याची वाढ आणि कर्मं ही दोषांना आमंत्रित देणारी असतात. उत्कृष्ट अशी षड्रस पक्वान्ने तयार करून ती मडक्यात घालून जर चव्हाट्यावर नेऊन ठेवली तर त्यांचे काय होते? कुत्रीच ती खाऊन फस्त करतात! सज्जन लोक त्याला हातही लावत नाहीत! तसेच अभक्तांचे होते. जो कधीच सत्कर्मं करीत नाही, तो सगळ्या भवदु:खांना आमंत्रण देत असतो! म्हणून उच्चनीचता, हीनदीनता यांचा भक्तीशी संबंध लावू नये. पशुदेह जरी प्राप्त झाला तरी भक्तीस मुकू नये. गजेंद्राच्या धाव्यासरशी मी त्याला मगरमिठीतून सोडवण्यासाठी तात्काळ धावून गेलो की नाही? त्याचे पशू असणे हे त्याच्या भक्तिआड आले का? नाही! अशी थोरवी आहे भक्तीची!

(क्रमश:)



मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३