जर आपण आज ठोस पावले उचलली नाहीत तर उद्याचे कॅम्पस ज्ञानाचे केंद्र न राहता दुःखाचे केंद्र बनतील. सरकार, विद्यापीठ प्रशासन, पालक व समाज या सर्वांनी एकत्रित जबाबदारी स्वीकारणे हाच एकमेव मार्ग आहे.
गेल्या काही वर्षांत देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी आत्महत्यांच्या व अकस्मात मृत्यूंच्या बातम्या वारंवार येत आहेत. बीआयटीएस, आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये घडलेल्या घटनांनी प्रश्न निर्माण केला आहे की, उच्च शिक्षणाचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसंपादनाचा सोहळा राहिला आहे का, की तो मानसिक छळ व दबावाची अखंड प्रयोगशाळा बनली आहे? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, आपल्या राज्यात दहा महिन्यांच्या कालावधीत एकाच शैक्षणिक संस्थेत पाच विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे. ही केवळ दुर्दैवी घटना नाही, तर एक धोक्याची घंटा आहे. गोव्यातील बिट्स पिलानी ही देशातील एक नामांकित खासगी शिक्षणसंस्था असून स्पर्धात्मक प्रवेश, उच्चस्तरीय शिक्षण व संशोधन हे त्याचे वैशिष्ट्य आहे परंतु या मृत्यूंनी संस्थेच्या कॅम्पस संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. परवाच्या ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्युमागे प्रेमभंगाचे कारण समोर आलेले असले तरी प्रत्यक्षात असह्य तणाव हे खरे कारण आहे, असे म्हणता येईल. उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. गुण, प्रोजेक्ट्स, प्लेसमेंट, संशोधनाच्या अपेक्षा, पालकांची व समाजाची अपेक्षा या सर्वांचा ताण विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या थकवतो. हा ताण ओझे बनून जीवघेणा ठरू शकतो.
अनेक कारणांपैकी टॉपर होण्याच्या शर्यतीत अनेक विद्यार्थी संघर्ष करीत असतात. अपयशाचा स्वीकार करणे त्यांना अवघड जाते. एकटेपणा व घरापासून दुरावा म्हणजेच कुटुंब व जवळचे मित्र नसल्याने भावनिक आधार कमी मिळतो. अशा मुलांना समुपदेशानाची गरज असते, पण समुपदेशन घेतले तर कमकुवत ठरवले जाईल, अशी भीती त्यांच्या मनात सतत वाटत असते. काही संस्थांमध्ये मानसिक आरोग्य केंद्रे फक्त औपचारिक असतात. बहुतेक नामांकित कॅम्पस काउन्सेलिंग सेंटर असल्याचा दावा करतात. पण विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्या सेवांपर्यंत पोहोचतात का? कलंक, भीती आणि संस्थेच्या कठोर शैक्षणिक वातावरणामुळे ते बहुधा एकटे पडतात. हॉस्टेल जीवनात घरापासून दूर राहणारे विद्यार्थी परकेपणा अनुभवतात. रॅगिंग किंवा गटबाजी, तसेच मैत्रीपूर्ण व समावेशक वातावरणाचा अभाव विद्यार्थ्यांना एकाकी बनवतो. यश, करिअर व जीवनशैलीच्या सततच्या तुलना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करतात. विद्यार्थी फक्त परीक्षेतील गुणांसाठी नाही तर भविष्यातील समाजासाठी घडवले जातात. त्यामुळे पालक, समाज, माध्यमे यांनीही अपयश म्हणजे शेवट नव्हे हा संदेश सतत देण्याची क्रिया कृतीतून करायला हवी. विद्यार्थ्यांचे मृत्यू हे केवळ व्यक्तिगत दु:ख नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा आहे. जर आपण आज ठोस पावले उचलली नाहीत तर उद्याचे कॅम्पस ज्ञानाचे केंद्र न राहता दुःखाचे केंद्र बनतील. सरकार, विद्यापीठ प्रशासन, पालक व समाज या सर्वांनी एकत्रित जबाबदारी स्वीकारणे हाच एकमेव मार्ग आहे. पूर्णवेळ म्हणजे २४ x ७ हेल्पलाईन्स असल्यास विद्यार्थी कधीही मदत घेऊ शकतील. प्रत्येक कॅम्पसवर प्रशिक्षित सायकॉलॉजिस्ट असावेत. विद्यार्थ्यांमधील नैराश्य वा वर्तनातील बदल लवकर ओळखता यावेत यासाठी प्रशिक्षित शिक्षक असायला हवेत. विद्यार्थ्यांनी समुपदेशकाची मदत घेतल्याचे अन्य कोणालाही कळू नये, याची खबरदारी घ्यायला हवी. पालक व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यासाठी पालकांना वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती द्यायला हवी. केवळ प्रशासन नव्हे, तर शिक्षक, मित्रपरिवार, विद्यार्थी संघटनांनाही या प्रयत्नांत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. योग, ध्यान, क्रीडा, संगीत, संवाद सत्रे यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
जगातील अन्य देशांमधील स्थिती वेगळी नाही. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये वेलनेस सेंटर आणि समुपदेशक हे अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे घटक मानले जातात. आत्महत्या प्रतिबंधासाठी विशेष दल कार्यरत असतात. जपानमध्ये विद्यापीठांनी प्रत्येक विभागात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांना नियमित मानसशास्त्रीय तपासणी व संवाद सत्रे घ्यावी लागतात. युरोपियन देशांत अभ्यासासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम बंधनकारक केल्याने मानसिक संतुलन राखले जाते. भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाने मानसिक आरोग्य नीती बनवली आहे, पण ती प्रामुख्याने कागदावरच असल्याचे दिसते. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन व्हावे. गरीब विद्यार्थ्यांना फी व राहणीमानाचा ताण कमी करण्यासाठी शिष्यवृत्तीचा विस्तार व्हावा. आत्महत्येच्या घटनेनंतर संस्थेची चौकशी होऊन जबाबदारी व दंडात्मक कारवाई व्हायला हवी, अशा काही सूचना तज्ज्ञ मंडळींनी केल्या आहेत. अशा घटनांनी केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होत नाही, तर संस्थेची प्रतिष्ठा आणि समाजाचा विश्वासही डळमळतो. तातडीची व ठोस कारवाई केल्याशिवाय ही साखळी थांबणार नाही.