पाकिस्तान ऐतिहासिक अन्नसंकटाच्या उंबरठ्यावर

Story: विश्वरंग |
06th September, 12:13 am
पाकिस्तान ऐतिहासिक अन्नसंकटाच्या उंबरठ्यावर

पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात गंभीर अन्नसंकटाचा सामना करत आहे. गहू आणि पिठाच्या किमतींमध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सरकार पुरेसा साठा असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात कराचीसह देशभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये गहू विक्रमी दराने विकला जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दोन वेळची भाकरी मिळणेही कठीण झाले आहे, ज्यामुळे देशात भूक आणि राजकीय अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे.

कराचीमध्ये घाऊक गव्हाचा भाव प्रति किलो ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो जुलैमध्ये ६२ आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत ७२ रुपये प्रति किलो होता. घाऊक बाजारात चक्की पिठाचा भाव १३५ रुपये प्रति किलोवर पोहोचला असून, त्यात एका महिन्यात २० रुपयांनी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या पिठाचा भाव १०३ रुपये प्रति किलो झाला आहे, तर १० किलोच्या पिठाच्या पॅकेटची किंमत ७९४ रुपये झाली आहे. २० किलोचे पॅकेट १,७०० ते २,१०० रुपयांदरम्यान विकले जात आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काही महिन्यांत पिठाचे दर २०० रुपये प्रति किलोचा टप्पा पार करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे तत्कालीन केंद्रीय अन्न सुरक्षा मंत्री राणा तनवीर हुसैन यांनी देशात ३३.४७ दशलक्ष टन गहू उपलब्ध असल्याचा दावा केला असून, आयात करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मात्र, उद्योग आणि गिरणी मालकांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत आणि ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पुराचे पाणी सिंध प्रांताकडे सरकत आहे. संयुक्त राष्ट्रांनी याला केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, हवामान बदलाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानकडे ९ अब्ज डॉलरपेक्षा कमी परकीय चलन साठा शिल्लक आहे. जर देशाला गहू आयात करावा लागला, तर त्यासाठी १.५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च येईल. पाकिस्तानच्या ७२ टक्के लोकसंख्येची उष्मांक गरज गव्हावर आधारित आहे. सध्या नान आणि रोटी विकणारे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. कराचीतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, जर हीच परिस्थिती राहिली, तर कोट्यवधी कुटुंबांसाठी पीठ घेणे आवाक्याबाहेर होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि राजकीय अशांतता वाढू शकते.

 - सुदेश दळवी