२६ देशांच्या प्रमुख उपस्थितीत चीनने नुकतेच जे भव्य शक्तिप्रदर्शन केले ते डोळे दिपवणारे आणि जगाला धडकी भरवणारेच आहे. अमेरिकेला खडबडून जागे करतानाच जगाच्या आगामी वाटचालीचे संकेतही चीनने दिले आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजधानी बीजिंग येथे चीनने भव्यदिव्य स्वरूपाच्या लष्करी संचलनाचे आयोजन केले. विशेष म्हणजे, या शक्तिप्रदर्शनाला थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २६ देशांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो, कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी, व्हिएतनामचे अध्यक्ष ल्युओंग क्युओंग, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, म्यानमारचे लष्करशहा मिंग आँग लेइंग, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याचबरोबर कझाकस्तान, काँगो, क्युबा, मंगोलिया आदी देशांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चीनच्या लष्कराने अतिशय दिमाखदार आणि नेत्रदीपक असे संचलन केले. त्यामुळे त्याची चर्चा जगभर होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने चीनने अनेक हेतू साध्य केले आहेत. खासकरून बलाढ्य अमेरिकेच्या पोटात नक्कीच गोळा आला असणार!
चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी शांघाय शिखर परिषद (एससीओ) आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची आठ दशके यानिमित्त आयोजित लष्करी संचलनाच्या माध्यमातून मोठी चाल खेळली आहे. या शांघाय शिखर परिषदेला एकूण दहा देशांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात रशिया, भारत, इराण, बेलारूस, कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तान या देशांचा समावेश होता. ही बैठक अपेक्षेप्रमाणे जोरदार झाली. परिषदेचे सर्वच्या सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावत त्याचे महत्त्व वाढवले. चीनचा विस्तारवाद, आक्रमकता आणि गरीब देशांना जाळ्यात ओढण्याच्या इराद्यांची भलेही भरपूर चर्चा होत राहते, पण चीनमधील बैठकीकडे कुणीही पाठ फिरवली नाही. तर, याच बैठकीच्या दोन दिवसांनी भव्य अशा लष्करी संचलनाचे आयोजन झाले. चीनने आपल्या मनीषेप्रमाणे सारे काही पार पाडले. चीन हा बेभरवशाचा देश असल्याचा कितीही कांगावा केला जात असला तरी प्रत्यक्षात त्याच्या निमंत्रणावरून मध्य आशिया आणि दक्षिणपूर्व आशियामधील देशांचे नेते आवर्जून संचलनात सहभागी झाले. याचाच अर्थ चीनला हे देश स्वीकारत आहेत किंवा चीनविषयी त्यांची फारशी तक्रार नाही. अपवाद फक्त फिलिपिन्सचा. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दादागिरीचा निषेध करण्यासाठीच फिलिपिन्सने या संचलनाकडे पाठ फिरविली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या संचलनासाठी उपस्थित राहिले नाहीत. संचलनात सहभागी होण्याचे निमंत्रण आणि आग्रह चीनकडून एससीओ बैठकीत मोदींना करण्यात आला. मात्र, भारताने चातुर्य दाखविले. त्याचे कारण म्हणजे जपान. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला. त्यामुळे जपानमध्ये प्रचंड वाताहत झाली. अखेर जपानने शरणागती पत्करली. परिणामी, दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. पंतप्रधान मोदी हे चीनला जाण्यापूर्वी जपानला गेले होते. तेथे द्विपक्षीय चर्चा आणि अनेक करार करण्यात आले. अनेक दशकांपासून भारत आणि जपान यांच्यात सौहार्दाचे संबंध तसेच घट्ट नाते आहे. त्यामुळे विविध बाबींची देवाणघेवाणही दोन्ही देशात होते. जपानशी संबंध बिघडतील असे कुठलेही कृत्य भारताकडून केले जात नाही. आताही तसेच घडले. चीनने लष्करी संचलनाद्वारे जो विजयोत्सव साजरा केला तो प्रत्यक्षात जपानची जखम आणि माघारी याचे द्योतक आहे. संचलनात भारत सहभागी झाला असता तर जपान नक्कीच नाराज झाला असता.
लष्करी संचलनात चीनने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले. त्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, महासागरांच्या पाण्याखाली वापरले जाणारे महाकाय ड्रोन, अत्याधुनिक लढाऊ विमाने यांचा समावेश होता. ‘एलवाय-१’ या लेझर शोचे विशेष आकर्षण होते. नवी क्रूझ क्षेपणास्त्रे, चिलखती वाहने, संरक्षण यंत्रणा, तिन्ही दलांच्या ताफ्यातील अत्याधुनिक आणि प्रभावी शस्त्रास्त्र यांचेही प्रदर्शन चीनने अतिशय दिमाखात केले. त्यामुळेच उपस्थित २६ देशांचे प्रमुखही अचंबित झाले.
चीनच्या या संचलनाने नक्की काय साध्य झाले? हे पाहणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेला शह देण्याची क्षमता चीनमध्ये असल्याचा संदेश देतानाच आपल्या निमंत्रणावर जगातील २६ देशांचे प्रमुख जमू शकतात हे सुद्धा चीनने सिद्ध केले आहे. तसेच, या सर्व देशांना आपली शक्ती किती आणि कशी आहे हे सुद्धा प्रदर्शनातून स्पष्ट केले. केवळ आशिया खंडच नाही, तर जगाचेही नेतृत्व चीन करू शकतो, हे चीनने दाखवले. या संचलनामुळे ट्रम्प यांचा जळफळाट झाला असण्याची शक्यता आहे. जगभरात कुठल्याही देशाचा दबदबा वाढू नये यासाठी अमेरिका सतत आग्रही असते. त्यातच ट्रम्प यांनी आयात शुल्काद्वारे चीनला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण चीनने जोरदार पलटवार करून अमेरिकेला चांगलाच धडा शिकविला आहे. ट्रम्प यांच्या हेकेखोर आणि मनमानी कारभारामुळे जगभरात अस्वस्थता आहे. तसेच, रशिया कमकुवत झाला आहे. त्यामुळे जगात चीनचा उदय झाला असून इथून पुढे अनेक बदल घडण्याचे संकेतही या संचलनाने दिले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या सांगतेची आठ दशके पूर्ण होत असताना अमेरिका वा युरोपिय देशात शांतता आहे. अशा स्थितीत चीनने याचा उत्सव साजरा करून वेगळा संदेश दिला आहे. जपानसारखा अग्रेसर देश शेजारी असला तरी त्याच्याशी चीनचे फार जमत नाही. बहुतांश देशांची बाजारपेठ काबीज करून जगभरातील व्यापारावर वर्चस्व मिळविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यासाठीच उत्पादन आणि वितरण साखळीवर तो विशेष मेहनत घेत आहे. प्राचीन रेशीम मार्गाच्या धर्तीवर सुरू केलेला महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्र आमच्या दिमतीला असून २० हजार किमीच्या क्षेपणास्त्राद्वारे आम्ही जगातील कुठल्याही ठिकाणाला नष्ट करू शकतो, हे सुद्धा जिनपिंग यांनी दाखविले आहे.
२००८ साली चीनने बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन करून जगाचे लक्ष वेधून घेतले. आता हे नेत्रदीपक लष्करी संचलन करून चीनने जगभरात धडकी भरवली आहे. विशेष म्हणजे, ज्या तियानमेन चौकाचा इतिहास रक्तरंजित आहे, त्याच चौकात हा सोहळा आयोजित करून जिनपिंग यांनी हे स्पष्ट केले आहे की हा नवा चीन आहे आणि त्याच्या महत्त्वाकांक्षाही नव्या आहेत.
- भावेश ब्राह्मणकर
(लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे
अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)