म्हापशातील प्रकार : स्थानकाबाहेरील वातावरणावर पोलिसांनी मिळवले नियंत्रण
पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या जमावाला शांत करताना पोलीस निरीक्षक निखिल पालेकर व सहकारी. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : एकतानगर, हाऊसिंग बोर्ड येथे ईद-ए-मिलादनिमित्त केलेल्या विद्युत रोषणाईवरून एका हिंदू महिलेने मुस्लिम समुदायाच्या लोकांना शिविगाळ करून अपमानास्पद भाषा वापरली. या प्रकारावरून हिंदू-मुस्लिम समुयांमध्ये वाद झाला. प्रकरण चिघळल्याने शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले. म्हापसा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर महिलेने माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा पडला.
रविवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ईद-ए-मिलादनिमित्त एका मशिद समितीने एकतानगरमध्ये विद्युत रोषणाई करून फलक लावले होते. या रोषणाईवरून तीन-चार दिवसांपासून हिंदू महिला आणि मुस्लिम लोकांमध्ये वाद सुरू होता. रोषणाईसाठी आम्ही संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेतली. तरीही ही महिला आम्हाला रोषणाईवरून अपमानास्पद शब्द वापरून शिविगाळ करत होती. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली.
रोषणाईसाठी वापरलेले साहित्य काढताना रविवारी दुपारी वाद चिघळला. जमावाने संशयित महिलेच्या घराबाहेर गराडा घालून महिलेच्या अटकेची मागणी केली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित महिलेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जमावाने लावून धरली. पोलिसांनी महिलेला तिच्या खासगी वाहनातून पोलीस स्थानकात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला पोलीस वाहनातूनच नेण्याचा जमावाने हट्ट धरला. त्यामुळे काही वेळ जमाव आणि पोलिसांमध्ये खटके उडाले.
वाढता विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी अखेर महिलेला पिंक फोर्स वाहनातून पोलीस स्थानकावर आणले. जमावही मागोमाग पोलीस स्थानकावर दाखल झाला. स्थानकाचे मुख्य फाटक बंद करून पोलिसांनी जमावाला गेटबाहेर रोखून धरले. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या शिष्टाईमुळे अखेर त्या महिलेने मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळासमोर तोंडी माफी मागितली. सुमारे चार तास दोन गटांत संघर्ष चालल्याने एकतानगर व म्हापसा पोलीस स्थानकाबाहेर तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक पालेकर यांनी त्यांच्या केबिनमध्ये मुस्लिम समुदायाचे शिष्टमंडळ आणि हिंदू संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर चर्चा केली. तिथे त्या महिलेने शिष्टमंडळासमोर चूक मान्य केली व पुन्हा वाद घालणार नाही, असे आश्वासन दिले. मुस्लिम शिष्टमंडळाने महिलेने माफी मागितल्याचे पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या जमावाला सांगितले. महिलेने बाहेर येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी जमावाने केली. या ठिकाणी काही हिंदू संघटनांनी नारेबाजी केल्याने वातावरण तंग झाले होते.
प्रकरण योग्य प्रकारे हाताळल्याबद्दल पोलिसांचे कौतुक
पोलिसांनी सतर्क राहून हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले. वाद चिघळणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली. पोलीस व इतरांनी मध्यस्थी करून संतप्त झालेल्या मुस्लिम जमावाला समजावले. त्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी संशयित महिलेला लिखित हमीपत्र घेऊन सोडून दिले.
धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी वास्कोत एकाला अटक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : मुस्लिम सुमदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी बसुराज माकपूर याला अटक केली. संशयित दुसरा युवक जुझे इनासियो रॉड्रिग्ज याचा शोध सुरू आहे. माकपूर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फेसबूकवर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मदिना मशिद ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी अब्दुल खान यांनी पोलिसांत दाखल केली होती. प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्याचे समजताच शेकडो मुस्लिम शनिवारी सायंकाळी जमा झाले. त्यांनी संशयितांविरोधात कडक कारवाईची मागणी केली. पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक यांनी जमावाची समजूत काढली. संशयितांविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जमाव शांतपणे निघून गेला. यानंतर संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. बसुराज माकपूर (शांतीनगर वास्को) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निखिल नाईक देसाई पुढील तपास करत आहेत.