पोलिसांनी ठोठावला दंड
पणजी: किनाऱ्यावर गाडी चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे काही पर्यटकांना चांगलेच महागात पडले. महाराष्ट्रातून आलेल्या एका गाडीतील पर्यटकांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून आपली गाडी थेट हणजुण येथील समुद्राच्या किनाऱ्यावर नेली. यामुळे त्यांची गाडी वाळूमध्ये रुतून बसली. काहीवेळाने समुद्राचे पाणी भरतीमुळे वाढले तेव्हा पर्यटकांची त्रेधातिरपिट उडाली. अखेर, स्थानिक प्रशासनाला या घटनेत हस्तक्षेप करावा लागला.
गाडीला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला मोठी मेहनत घ्यावी लागली. अशा घटनांमुळे केवळ वाहनांचेच नाही, तर जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी किनारी भागातील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राच्या किनाऱ्यावर गाडी चालवणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित पर्यटकांवर पर्यटक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.