कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणे ठरले 'आत्मघाती'? आयटी कंपन्यांचे ९५% प्रोजेक्ट्स फेल!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणे ठरले 'आत्मघाती'? आयटी कंपन्यांचे ९५% प्रोजेक्ट्स फेल!

बंगळूरु : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या 'एमआयटी' (MIT) च्या एका अहवालानुसार, एआयवर मोठी गुंतवणूक करणाऱ्या टेक कंपन्यांसाठी हा निर्णय 'आत्मघाती' (आत्महत्या करणारे) ठरू शकतो. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, एआयवर आधारित ९५% प्रोजेक्ट्स अयशस्वी ठरले आहेत, तर फक्त ५% प्रोजेक्ट्सच यशस्वी झाले आहेत.

एआयवरील मोठे दावे फसले?

२०२२ मध्ये चॅटजीपीटी लाँच झाल्यानंतर गुगल आणि मेटासारख्या अनेक टेक कंपन्या जनरेटिव्ह एआयच्या शर्यतीत उतरल्या. या कंपन्यांनी त्यांच्या मॉडल्सवर कोट्यवधी रुपये खर्च केले, पण त्यांची विश्वासार्हता अजूनही प्रश्नांच्या घेऱ्यात आहे. एमआयटीने जारी केलेल्या 'द जेनएआय डिवाइड: स्टेट ऑफ एआय इन बिझनेस २०२५' (The GenAI Divide: State of AI in Business 2025) या अहवालात एआयच्या व्यावसायिक वापरासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एआयला दिलेली गोपनीय माहिती काही दिवसांनी सार्वजनिक होत असल्याची प्रकरणे देखील आता समोर येऊ लागली आहेत.

अहवालानुसार, अनेक कंपन्यांनी एआयचा वापर करून आपला महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु त्यांचे हे प्रयत्न सुरुवातीलाच अपयशी ठरताना दिसत आहेत. शक्तिशाली एआय मॉडेल्स वापरूनही केवळ ५% पायलट प्रोजेक्ट्सच यशस्वी झाले आहेत, तर ९५% प्रोजेक्ट्स अपयशी ठरले आहेत. कंपन्यांनी एआय स्वीकारण्यात दाखवलेल्या उत्साहाचा त्यांना पुरेसा फायदा मिळत नसल्याचे यातून स्पष्ट होते.

एआय यशस्वी का नाही?

अहवालात एआय इंटिग्रेशनच्या (AI Integration) अपयशामागे काही प्रमुख कारणे दिली आहेत. कंपन्यांच्या अवास्तव अपेक्षा, अभ्यासाअभावी चुकीचे प्रॉम्पट इंटिग्रेशन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एआयचा वापर करण्याची तयारी नसणे ही काही प्रमुख कारणे आहेत. अनेक कंपन्यांनी एआय आणल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली, ज्यामुळे उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, एमआयटीच्या या संशोधनाने ही धारणा चुकीची ठरवली आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, एआय मॉडेल पूर्णपणे विश्वासार्ह नाहीत. केवळ ३०% एआय मॉडेल्सच ऑफिसमधील कामे आत्मविश्वासाने हाताळू शकतात. एंटरप्राइज पातळीवर एआयचा वापर अजूनही यशस्वी ठरत नाहीये, कारण कंपन्यांनी एआय साधनांना त्यांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी पुरेसा वेळ किंवा गुंतवणूक केलेली नाही.

हेही वाचा