मॉस्को : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात देणे आता सहज शक्य होईल. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियाच्या वैज्ञानिकांनी कर्करोगावर प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला असून, लवकरच या लसीला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या लसीचे नाव ‘एंटरोमिक्स’ (Enteromix) असे असून, ती उपचारासाठी पूर्णपणे तयार असल्याचे रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने जाहीर केले आहे.
स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, FMBA च्या प्रमुख वेरोनिका स्क्वोर्तसोवा यांनी सांगितले की, ही mRNA आधारित लस पूर्व-क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी झाली आहे. ‘एंटरोमिक्स’ ही लस पारंपरिक किमोथेरपी किंवा रेडिएशन उपचारांपेक्षा वेगळी आहे. या लसीचा मुख्य उद्देश कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांना नष्ट करणे आहे. त्यामुळे ट्यूमरचा आकार कमी होतो आणि काही प्रकरणांमध्ये तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो.
या लसीची निर्मिती रशियाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडियोलॉजिकल सेंटर (NMRRC) आणि एंजेलहार्ड्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी (EIMB) यांनी संयुक्तपणे केली आहे. या लसीमध्ये चार निरुपद्रवी विषाणूंचा वापर करण्यात आला आहे, जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासोबतच शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला सक्रिय करतात. क्लिनिकल चाचण्यांदरम्यान, या लसीने ट्यूमरची वाढ थांबवणे आणि त्याला पूर्णपणे नष्ट करणे अशा प्रकारचे ६० ते ८० टक्के सकारात्मक परिणाम दाखवले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या लसीवर संशोधन सुरू होते. त्यातील शेवटची तीन वर्षे पूर्व-क्लिनिकल अभ्यासासाठी समर्पित होती. आता ही लस वापरासाठी तयार असून, आम्ही केवळ सरकारी मंजुरीची वाट पाहत आहोत, असे स्क्वोर्तसोवा यांनी सांगितले. या लसीमुळे रुग्णांच्या जगण्याच्या दरात वाढ झाल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे. एफएमबीएने या वर्षी उन्हाळ्यात लसीला मंजुरी मिळवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज केला होता. त्यामुळे लवकरच कर्करोगाच्या उपचारात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.