केरळच्या राज्यपालांची सर्वोच्च न्यायालयात धाव
तिरुअनंतपुरम : केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ आणि केरळ डिजिटल विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या निवड प्रक्रियेतून दूर ठेवण्याची मागणी केली आहे. राज्यपाल स्वतः या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू आहेत.
मुख्यमंत्री पिनराई विजयन स्वतःच या विद्यापीठांच्या स्थापनाशी संबंधित असल्याने निवड प्रक्रियेत त्यांचा सहभाग म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष होईल असे याचिकेत म्हटले आहे. तसेच विद्यापीठ अधिनियमांमध्ये मुख्यमंत्री वा राज्य सरकारला अशी भूमिका देण्यात आलेली नाही, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी माजी न्यायाधीश सुधांशु धूलिया यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्याबाबत राज्यपालांना हरकत नसली तरी राज्य सरकारने सुचविलेल्या सदस्यांच्या सहभागाला त्यांनी आक्षेप घेतला आहे. याचिकेत समितीत यूजीसी अध्यक्षांच्या प्रतिनिधीचा समावेश व्हावा, तसेच निवड झालेल्या उमेदवारांची वर्णानुक्रमानुसार यादी कुलगुरूकडे पाठवून अंतिम निर्णयाचा अधिकार त्यांच्याकडे असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदु यांनी राज्यपालांची याचिका निराधार असल्याची टीका केली. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या पुढाकारामुळेच डिजिटल विद्यापीठ साकार झाले असून, हा वाद सामंजस्याने सोडवला जावा, असेही त्यांनी सांगितले.